डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमातून, सप्रेम संस्था व नवदृष्टी संस्था यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात प्रथमच मियावाकी पद्धतीवर आधारित वृक्षलागवड स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेला ‘डॉर्फ केटल जंगल कप’ असे नाव देण्यात आले.
एका गुंठ्यात ४२ प्रजातींची ३०० देशी झाडे
या स्पर्धेअंतर्गत गावांमध्ये एका गुंठा जागेत ४२ प्रकारची सुमारे ३०० देशी वृक्षांची घनदाट लागवड केली जाते. झाडे एकमेकांच्या अगदी जवळ लावली जात असल्याने त्यांच्यात नैसर्गिक वाढीची स्पर्धा निर्माण होते. परिणामी अवघ्या २ ते ३ वर्षांत दाट, समृद्ध आणि जैवविविधतेने नटलेले जंगल तयार होते. जंगल तयार झाल्यानंतर गावकऱ्यांमध्येही वृक्षसंवर्धनाची स्पर्धा सुरू होते आणि गाव हरिततेकडे वाटचाल करू लागते.
या उपक्रमाला स्पर्धेचे स्वरूप देण्यात सामाजिक उत्तरदायित्व प्रमुख संतोष जगधने, डॉ. नागेश टेकाळे, सामाजिक शास्त्रज्ञ प्रकाश गायकवाड तसेच प्रकल्प समन्वयक हिमांशू लोहकरे यांचा मोठा सहभाग आहे. पाहता पाहता महाराष्ट्रातील १५५ हून अधिक गावांमध्ये मियावाकी जंगलांची निर्मिती झाली आहे.
२७ फेब्रुवारी २०२६ रोजी संगमनेर येथे भव्य सोहळा
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील ढोले पाटील लॉन्स येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉर्फ केटल जंगल कप २.० चा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेमध्ये संगमनेर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत आणि काशाई देवीच्या छत्रछायेखाली वसलेल्या एक छोटयाश्या सोन्यासारखा सोनेवाडी या गावाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.आले. सोनेवाडी ग्रामस्थांसाठी हा क्षण नक्कीच आनंददायी व पुढील वाटचालीसाठी नवी दिशा देणरा आहे
विजेते ग्रामपंचायती
प्रथम क्रमांक (₹१,००,०००) – संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी ग्रामपंचायत
द्वितीय क्रमांक (₹७५,०००) – अकोले तालुक्यातील लहित खुर्द ग्रामपंचायत
तृतीय क्रमांक (₹५०,००० – विभागून) – येवला तालुक्यातील कुसूर व वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील डोंगरगाव ग्रामपंचायत
उत्तेजनार्थ (₹१०,०००) पुरस्कार
कारंजा (जि. वाशिम) तालुक्यातील उंबरडा, येवला तालुक्यातील रेंडाळे व विसापूर, तसेच संगमनेर तालुक्यातील मालदाड, निळवंडे आणि साकूर ग्रामपंचायतींना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन
या कार्यक्रमास राजस्थानचे जलपुरुष राजेंद्रसिंह, पद्मश्री चैताराम पवार, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, सामाजिक कार्यकर्त्या नताशा मिश्रा, सिमंतिनी कोकाटे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ तसेच सप्रेम संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जलपुरुष राजेंद्रसिंह यांचे सखोल मार्गदर्शन
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले राजस्थानचे जलपुरुष राजेंद्रसिंह यांचे प्रभावी भाषण. ते म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे निसर्ग संवर्धन करणाऱ्यांना निसर्गाकडून मिळालेला सन्मान आहे. ते पुढे म्हणाले की, जेव्हा पृथ्वीवरील हिरवळ नष्ट होते तेव्हा पावसाचे चक्र विस्कळीत होते. कधी तीव्र दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. धरतीची हिरवळ केवळ आपल्या देशी वृक्षांच्या जंगलांमुळेच सुरक्षित राहते. मात्र आज रासायनिक शेती ही मोठी समस्या बनली असून ती जमिनीची सुपीकता आणि पर्यावरण दोन्हींसाठी घातक ठरत आहे. मियावाकी जंगलांच्या माध्यमातून डॉर्फ केटल कंपनी, सप्रेम आणि नवदृष्टी संस्था अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदर्शी कार्य करत आहेत, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
चंबळचे उदाहरण –बंदुका पाण्याने खाली ठेवल्या
राजेंद्रसिंह यांनी आपल्या कार्याचा दाखला देताना चंबळ खोऱ्यातील परिवर्तनाची कथा सांगितली. त्यांनी नमूद केले की, चंबळ परिसरात जलसंवर्धनाच्या कामातून मोठा सामाजिक बदल घडून आला. त्या बंदुका मी नाही सोडवल्या, त्या बंदुका पाण्याने सोडवल्या, असे ते म्हणाले.
पाण्याच्या प्रश्नावर काम केल्यामुळे चंबळमधील सुमारे ६००० हून अधिक दरोडेखोरांनी शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला. महिलांच्या सहभागातून जलव्यवस्थापन उभे राहिले आणि त्यामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक परिवर्तन घडले.तसेच त्यांनी अरवली पर्वतरांगांमधील अवैध खननाच्या प्रश्नावरही भाष्य करत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव करून दिली.
झाडांकडून शिकण्याची गरज– संतोष जगधने
सामाजिक उत्तरदायित्व प्रमुख संतोष जगधने यांनी मियावाकी जंगलातील एकतेचा उल्लेख करत सांगितले की, ४०-४५ प्रजातींची झाडे कोणताही भेदभाव न करता एकत्र वाढतात. झाडांना फक्त देणेच माहिती असते. अगदी मरतानाही ती आपल्या मुळांद्वारे पोषक तत्त्वांची देवाणघेवाण करतात. माणसाने झाडांकडून शिकण्याची आवश्यकता आहे.
शासन-समाज-उद्योग एकत्र आले तर बदल वेगाने घडतो– आनंद भंडारी
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले की, जलसंधारण, पर्यावरण, उपजीविका आणि ज्येष्ठ नागरिकांसारख्या दुर्लक्षित क्षेत्रात डॉर्फ केटल, सप्रेम व नवदृष्टी संस्था कार्यरत आहेत ही आनंदाची बाब आहे. शासन, समाज, सेवाभावी संस्था आणि उद्योग क्षेत्र एकत्र आल्यास समाजात सकारात्मक बदल वेगाने घडू शकतो, असे त्यांनी प्रतिपादन केले.
आजचे विजेते उद्याचे मार्गदर्शक – डॉ. प्रकाश गायकवाड
डॉ. प्रकाश गायकवाड यांनी विजेत्या गावांचे अभिनंदन करत सांगितले की, आजचे विजेते उद्याचे मार्गदर्शक ठरतील आणि ही हरित चळवळ अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.