म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यात मान्सूनच्या वाटचालीत मोठा खंड पडला आहे. ६ जूनला मान्सून तळकोकणात दाखल झाल्यानंतर त्याने ८ जूनपर्यंत हर्णे ते सोलापूरपर्यंत मजल मारली; तेलंगणा, झारखंड, बिहार, ओडिशा येथेही आगेकूच केली. मात्र महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल थंडावली आहे. मात्र भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने नाराजी आहे. आता २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकणात पावसाचा जोर थोडा वाढू शकेल, असे प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
हवामान विभागाने गेल्या आठवड्यामध्ये मान्सूनची महाराष्ट्रात प्रगती नसल्याने महाराष्ट्रातील मान्सूनच्या प्रवासाबद्दल माहिती देणे थांबवले होते. १३ जूनच्या दैनंदिन माहितीमध्ये राज्याचा उल्लेख नव्हता. नंतर, १४ जूनच्या अहवालात महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवसांमध्ये मान्सून आगेकूच करण्याची शक्यता असल्याचे सांगितले. त्यानंतर, पुन्हा १६ जूनला महाराष्ट्राचा उल्लेख या माहितीतून काढून टाकण्यात आला. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात मान्सूनच्या वाटचालीची स्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्रात पावसाच्या वाटचालीमध्ये खंड पडल्याचे अखेर प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी संध्याकाळी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. राज्यात आर्द्रता असली, तरी अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतायुक्त जोरदार वाऱ्यांचा अभाव असल्याने पावसाला चालना मिळत नाही. मान्सूनच्या प्रवाहाशी संबंधित असलेले खालच्या पातळीवरील नैऋत्य वारे अरबी समुद्रावर कमकुवत झाले आहेत. परिणामी महाराष्ट्राची किनारपट्टी आणि अंतर्गत भागांकडे जाणारी आर्द्रता पुरेशा प्रमाणात नाही. पश्चिम हिंदी महासागर आणि अरबी समुद्रावरून वाहणारा विषुववृत्तीय प्रवाह नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी आर्द्रतेचा स्रोत म्हणून काम करतो, हा प्रवाह गेल्या काही दिवसांपासून कमकुवत झाल्याने मोसमी वाऱ्यांची हालचाल थंडावली आहे, असे हवामान विभागाने सांगितले. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळे, किंवा पश्चिम किनारपट्टीवरील पुरेशा तीव्रतेची द्रोणीय स्थिती यांसारख्या महत्त्वपूर्ण मान्सून हवामान प्रणाली मान्सूनच्या प्रगतीस मदत करतात, त्यांची यंदा अनुपस्थिती होती. मेडन-जुलियन ऑसिलेशन (एमजेओ) सारख्या प्रणाली सध्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागांमध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी सकारात्मक ठरण्याची शक्यताही नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
२४ जूननंतरच जोर हवामानाच्या या परिस्थितीमुळे राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकेल. २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकण पट्ट्यामध्ये पावसाचा जोर थोडा वाढू शकेल असे काही मॉडेलवरून दिसत आहे, अशीही माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा