मुंबईच्या वडाळ्यात धक्कादायक घटना घडली आहे. बियरच्या बाटलीला पाय लागल्याने ती फुटली. त्यावरुन झालेल्या वादात दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईत मंगळवारी सगळीकडे धुळवडीचा जल्लोष सुरू असताना वडाळ्यात मात्र उत्साहाला गालबोट लागले. बियरची बाटली पडून फुटल्याने झालेल्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत 20 वर्षीय तुषार उज्जैनवाला याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी अशी घटना घडल्याने परिसरात दु:ख व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे अतिशय क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडली आहे. अशाप्रकारे राडा करणाऱ्यांना पोलिसांचं भय नाही का? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात कार्यक्रमासाठी बांधलेल्या एका स्टेजच्या बाजूला चारजण बियर पित बसले होते. सायंकाळी चारच्या सुमारास तुषारचा भाऊ आणि त्याचा मित्र येथून चालले होते. तुषारच्या भावाचा पाय एका बियरच्या बाटलीला लागला आणि बाटली खाली पडून फुटली. यामुळे संतापलेल्या चौघांनी तुषारच्या भावासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ आणि धक्काबुक्की करतानाच त्यांनी बियरची मागणी केली. चौघे ऐकत नसल्याचे पाहून या तरूणाने घर गाठले आणि सर्व हकिकत तुषारला सांगितली.
दोन गटात वाद आणि हाणामारी
चौघांना जाब विचारण्यासाठी तुषार हा आणखी तिघांसह त्या ठिकाणी आला. यावेळी दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली. यानंतर तुषारसोबत असलेले तिघे बाजूला गेल्यानंतर पुन्हा वाद झाला. तुषार एकटाच असल्याचे पाहून चौघांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत तुषार बेशुद्ध पडल्याने येथील नागरिकांनी त्याला सायन रुग्णालयात नेले. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेतल तुषारला मारहाण करणाऱ्या चार तरूणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तसेच पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा