• Fri. Mar 6th, 2026
    Rajya Sabha Election 2026 : शरद पवारांना पाठिंबा द्या, काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडचा राज्यातल्या नेत्यांना फोन, वडेट्टीवारांनी आतली बातमी सांगितली

    राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना फोन करुन शरद पवारांना पाठिंबा देण्याची सूचना केल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज चार उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. यानंतर आता विरोधी पक्षांकडून देखील लवकरच उमेदवाराची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. या 7 पैकी 6 जागांवर भाजपचे उमेदवार जिंकून येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर यश मिळण्याची शक्यता आहे. पक्षीय बलाबल पाहता भाजपचे 4, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी 1 असे महायुतीचे 6 उमेदवार जिंकून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचा केवळ एक उमेदवार जिंकून येऊ शकतो. या एका जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच बघायला मिळत होती. पण अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर होऊ शकते अशा घडामोडी बघायला मिळत आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

    राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (3 फेब्रुवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीवेळी शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी महाविकास आघाडीकडून दिली जावी किंवा शरद पवारांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा मिळावा, अशी चर्चा झाल्याची माहिती आहे. जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना याबाबत माहिती दिली होती. एक-दोन दिवसांत याबाबतचा निर्णय निश्चित होईल, असं त्यांनी जाहीर केलं होतं. यानंतर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

    विजय वडेट्टीवर यांनी नेमकं काय सांगितलं?

    “आम्हाला आमच्या प्रभारींकडून फोन आला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना पाठिंबा देवून राज्यसभेवर पाठवलं पाहिजे, असं त्यांचं एकमत झालं. त्यामुळे उद्या शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार ठरतील. पण अजूनही तीन पक्ष एकत्र बसून याबाबत निर्णय घेत नाहीत तोपर्यंत हा अंतिम निर्णय आहे, असं समजण्याचं कारण नाही”, अशी सूचक प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

    संजय राऊत यांचं सूचक ट्विट

    दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील याबात सूचक ट्विट केलं आहे. “काँग्रेसने महाराष्ट्रातील राज्यसभेबाबत अखेर निर्णय घेतला आहे! महाविकास आघाडी एक आहे एकत्र राहील! जय महाराष्ट्र!”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा