• Sun. Jun 14th, 2026

    Trading Scam Kalyan: दोन वर्षे खात्यातून लाखो रुपये फिरवले, ट्रेडिंगच्या आमिषाने विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक, 50-60 विद्यार्थ्यांसोबत स्कॅम

    Trading Scam Kalyan: दोन वर्षे खात्यातून लाखो रुपये फिरवले, ट्रेडिंगच्या आमिषाने विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक, 50-60 विद्यार्थ्यांसोबत स्कॅम

    कल्याण-डोंबिवलीत ट्रेडिंगच्या आमिषाने ५०-६० विद्यार्थ्यांची बँक खाती उघडून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना नेते महेश गायकवाड यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेत कारवाईची मागणी केली आहे.

    कल्याण डोंबिवली विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाने फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदिप भणगे, कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात १८ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना ट्रेडिंगच्या आमिषाने गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. ठगांनी विद्यार्थ्यांकडून विविध कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली आणि त्या खात्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सुमारे ५० ते ६० विद्यार्थी फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती समोर आली आहे.

    ऑनलाईन ट्रेडिंगच्या आमिषाने जाळे

    या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित मित्रांमार्फत ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यासाठी बँक खाते उघडण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेण्यात आली. त्यानंतर संबंधित खात्यांमधून लाखो रुपयांची व्यवहारांची उलाढाल झाल्याचे दोन वर्षांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले.

    पोलिसांकडे तक्रार; कारवाईचे आश्वासन

    या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना घेऊन परिमंडळ ३ चे उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या खात्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी उपायुक्त झेंडे यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीला आपली वैयक्तिक कागदपत्रे, बँक तपशील किंवा ओटीपी देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

    Maharashtra TimesAhilyanagar Crime: ‘मी पोलीस आहे, ॲट्रॉसिटी दाखल करेन’; बस आगारामध्ये पोलिसाचा नशेत धिंगाणा, वाहक-चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, CCTV व्हिडिओ

    सखोल चौकशी सुरू; पालकांची कारवाईची मागणी

    दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात अशा प्रकारचे आणखी काही प्रकार घडले आहेत का, याबाबत पोलिस सखोल चौकशी करत आहेत. एकीकडे या घोटाळ्याचा भांडाफोड करण्याची मागणी फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.

    तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या निष्काळजीपणाचा गैरफायदा घेणाऱ्या टोळीविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणीही पालकांकडून करण्यात येत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा