• Fri. Mar 6th, 2026

    Maharashtra Police : याला म्हणतात महाराष्ट्र पोलीस! पुण्याकडे निघालेल्या कारला अचानक आग, हवालदार अमित साळुंखे बनले देवदूत

    Maharashtra Police : याला म्हणतात महाराष्ट्र पोलीस! पुण्याकडे निघालेल्या कारला अचानक आग, हवालदार अमित साळुंखे बनले देवदूत

    चेंढरे बायपासवर भर रस्त्यात ब्रीजा कार पेटली. यावेळी पोलीस हवालदार अमित साळुंखे यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच निरीक्षक सरिता चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : पोलीस आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत हे विविध घटनांमधून जाणवतं. राज्यासह देशात फोफावणाऱ्या अराजकतेला कमी करण्याचं काम पोलीस करतात. पोलीस कुख्यात दरोडेखोर आणि गुंडांचा नायनाट करतात. घरफोडी करणाऱ्या किंवा लुटमार करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळतात. तसेच काही मोठी दुर्घटना घडली तरी पोलीस सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धाव घेतात. आतादेखील पोलीस हवालदार अमित साळुंखे यांनी पुण्याच्या दिशेला निघालेल्या कारला अचानक आग लागल्यानंतर तत्परेतेन जी कारवाई केली तिचं कौतुक होत आहे.

    अलिबागजवळील चेंढरे बायपास परिसरात भररस्त्यात आज दुपारी एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. पुण्याकडे निघालेल्या पर्यटकांच्या मारुती सुझुकी ब्रीजा या गाडीला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार अमित साळुंखे यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि संभाव्य जीवितहानी टळली.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, सलग सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पुण्याहून काही पर्यटक रायगड जिल्ह्यात आले होते. सुट्टी संपल्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघाले असताना चेंढरे बायपासजवळ त्यांच्या गाडीमधून धूर निघू लागला आणि क्षणार्धात गाडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखत चालकासह सर्व प्रवाशांनी तात्काळ गाडीतून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला.

    ही बाब त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस हवालदार अमित साळुंखे यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता परिस्थितीचा ताबा घेतला. त्यांनी तातडीने नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. तसेच परिसरातील वाहतूक सुरक्षित अंतरावर वळवून मोठी दुर्घटना होण्यापासून रोखली. काही मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर ही आग पूर्णपणे विझविण्यात यश आले.

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या. या प्रसंगात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांच्या वेगवान आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. वाहतूक विभागाच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा