• Fri. Mar 6th, 2026
    Pune Crime : शेपूट अन् पाय पकडून हवेत फिरवलं, नंतर खाली आपटलं, पुण्यात भटक्या कुत्र्याला अमानुष मारहाण; VIDEO समोर

    Pimpri-Chinchwad Crime : एका तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्निल सखाराम सावंत या आरोपी विरोधात संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

    पिंपरी चिंचवड कुत्र्याला मारहाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात मानवतेला काळिमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका भटक्या कुत्र्याला काही माथेफिरूंनी भर रस्त्यात निर्दयीपणे मारहाण करत हवेत फिरवून जमिनीवर आपटलं. इतकंच नाही, तर त्याला चारचाकी वाहनाने उडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील तुकाराम नगर पोलीस स्टेशन हद्दीत 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. रात्री साधारण एक वाजण्याच्या सुमारास आरोपी स्वप्निल सखाराम सावंत याने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका भटक्या कुत्र्याला पाठीमागून हातात पकडलं.

    सीसीटीव्ही फुटेज समोर

    प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपीने त्या निष्पाप प्राण्याला हवेत गोल फिरवत जोरात जमिनीवर आपटलं. या अमानुष मारहाणीत कुत्रा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतरही आरोपी आणि त्याच्या सोबत असलेल्या सहा ते सात जणांनी भर रस्त्यात आरडाओरडा करत नाच केला आणि धिंगाणा घातला. धक्कादायक बाब म्हणजे, त्यानंतर आरोपींकडे असलेल्या चारचाकी वाहनाने भरधाव वेगाने जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जखमी कुत्र्याला उडवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. सुदैवाने कुत्रा थोडक्यात बचावला असल्याची माहिती मिळते.
    Maharashtra TimesAhilyanagar Crime : शाळेत एकटेपणाचा गैरफायदा, शिक्षकी पेशाला काळिमा, अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; गर्भवती झाल्यानं प्रकार उघड

    नागरिकांमध्ये संतापाची लाट

    ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी एका तरुणाने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर संत तुकाराम नगर पोलीस ठाणे येथे आरोपी स्वप्निल सखाराम सावंत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesBeed Accident : धुळवड खेळायला जाताना काळाचा घाला, कार चारदा पलटून विहिरीच्या कठड्यावर अडकली, तरुणाचा मृत्यू

    मानवतेला काळिमा

    पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर सहभागी आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. निष्पाप प्राण्यांवर होणाऱ्या अशा क्रूर घटनांमुळे समाजात संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा प्रकारांना आळा बसावा, अशी मागणी प्राणीप्रेमी आणि नागरिकांकडून केली जात आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेवर आता पोलिस काय कठोर पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा