• Thu. Aug 6th, 2026

    ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 6, 2026
    ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान सचिव प्रवीण दराडे यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या लोकप्रिय कार्यक्रमांतून राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ या योजनेविषयी सविस्तर माहिती देणारी सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे (भा.प्र.से.) यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात या विशेष मुलाखतीच्या पहिल्या भागाचे प्रसारण मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर होणार असून, त्यानंतर ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून या मुलाखतीचे प्रसारण १२ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम चांदोरकर यांनी केले आहे.

    राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे, कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि शाश्वत बनविणे तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती देणे या व्यापक उद्देशाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ सुरू केली आहे. या योजनेच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ या कार्यक्रमांमध्ये सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे (भा.प्र.से.) यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

    या मुलाखतीत योजनेची उद्दिष्टे, प्रमुख वैशिष्ट्ये, पात्रतेचे निकष, लाभार्थी निवडीची प्रक्रिया, अर्ज व पडताळणीसाठी विकसित करण्यात आलेली डिजिटल प्रणाली, पारदर्शक आणि कार्यक्षम अंमलबजावणी, सहकार विभागाची भूमिका तसेच या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना आणि ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या राज्याच्या विकासदृष्टीच्या पूर्ततेमध्ये या योजनेचे असलेले महत्त्व याविषयी सविस्तर व अधिकृत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी, सहकारी संस्था, कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटक तसेच नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेऊन योजनेविषयी अचूक, विश्वासार्ह आणि सर्वंकष माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    अधिकृत समाजमाध्यमे :

    X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

    Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

    YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

    ००००

    जयश्री कोल्हे/स.सं.

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed