• Fri. Mar 6th, 2026
    Pune News: पुण्यात 20 वर्षीय तरुणीने संपवलं जीवन, अभ्यासावरुन आई रागावल्यामुळे टोकाचं पाऊल

    Pune Student Ends Life: वाघोली परिसरात एका २० वर्षीय तरुणीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. आई अभ्यासावरुन रागावल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

    विद्यार्थिनीने इमारतीवरुन उडी मारुन संपवलं जीवन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, येरवडा: वाघोली परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वीस वर्षीय विद्यार्थिनीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मुलीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. आई अभ्यासावरून ओरडल्याने मुलीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

    नेमकं काय घडलं?
    सारा बलराम अंधारे (वय २०, रा. मॅजेस्टिक सोसायटी, भावडी रोड, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. साराने रोज अभ्यास करावा आणि बाहेर जाताना सांगून जावे, असे तिच्या आईचे म्हणणे होते. यावरून तिचा आईसोबत वाद झाला होता. शनिवारी (२८ फेब्रुवारी) आई, बहीण घरी असताना साराने दुपारी पाऊणच्या सुमारास इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली. वाघोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

    Maharashtra TimesPune Crime: सुखी संसाराचं स्वप्न भंगलं! लग्नानंतर तीन महिन्यांतच सासरच्यांकडून छळ, पुण्यात नवविवाहितेनं संपवलं जीवन
    महिलेची आत्महत्या
    दुसऱ्या एका घटनेत, पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना कर्वेनगर भागात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राणी तिरुपती कुऱ्हाडे (वय २५, रा. स्नेहांकित कॉलनी, कर्वेनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या भावाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली. सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील तपास करत आहेत.

    Maharashtra TimesPune PMP Bus: पुण्यातील पठ्ठ्याने कहरच केला! बसचा फुकट प्रवास करण्यासाठी शक्कल लढवली, पण एका चुकीने सगळा खेळ अंगलट
    धरणात उडी घेऊन तरुणाची आत्महत्या
    शहरातील धरणग्रस्तनगर भागात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुण रोहित विलास काटे नारंगी धरणाच्या पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ही घटना उघडकीस आली. रोहितने धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. रोहित अविवाहित होता. सकाळी साडेदहा वाजण्यापूर्वी त्याने नारंगी धरणात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असा कयास आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव हे करीत आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा