Nagpur HSC Paper Leak Case: सरटकर याला हे पेपर कोणी दिले, शिक्षण मंडळात कार्यरत अधिकाऱ्याने त्याला हे पेपर पुरविले का, याचा शोध विशेष तपास पथकाने सुरू केला आहे.
सरटकरने संबंधित शिकवणी वर्गाच्या संचालकांना हे पेपर पाठविले. त्यानंतर ते अनेक व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाले, अशी माहिती निष्पन्न झाली आहे.
या पेपरफूट प्रकरणात तपास पथकाने संदीप याच्यासह दिनेश कोटांगळे (वय ३६, रा. कबीरनगर), प्रदीप भय्यालाल जांगडे (वय ४०, रा. वैशालीनगर), मनीष शंभरकर (वय ४६, रा. गोदाम लेआउट, त्रिमूर्तीनगर), संदीप बाबुराव सरटकर (वय ४६, रा. जयताळा हनुमान मंदिराजवळ) या चौघांना अटक केली आहे. त्यांची चार दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. ‘सक्सेस ॲकेडमी’ या शिकवणी वर्गात शिक्षक दिनेश कोटांगळे आहे. विशाखा कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक प्रदीप आणि ‘एज्युकेशन ॲकेडमी’चा संचालक मनीष हा आहे.
Nagpur Crime: नागपुरात तब्बल 6.25 कोटींचा गांजा जप्त; DRIची मोठी कारवाई, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
आतापर्यंतच्या तपासात ‘टेक १’, ‘नेक्स्ट २००’ आणि ‘एक्सलेंस’ या तीन ग्रुपमध्ये परीक्षेच्या अर्ध्या तासापूर्वी पेपर व्हायरल झाले. पेपर व त्याची उत्तरे या ग्रुपमधून विद्यार्थ्यांपर्यंत पुरविण्यात आली. संदीप यानेच हे पेपर फोडल्याचा दावा करण्यात येत असून, त्याला ते कोणी पुरविले, याबाबत मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. व्हॉट्सॲपवर पेपर पोस्ट करण्यासाठी संदीप व जांगडे या दोघांनी अनेक मोबाइलचा वापर केला आहे. पेपर पाठविल्यानंतर त्यांनी व्हॉट्सॲपमधील डेटा डिलीट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. बुधवारी बारावी पेपरफूट समोर आली. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ‘एक्सलेंट अकादमी’ या शिकवणी वर्गाचे संचालक मुस्तफा खान मुनीर खान (वय ४२, रा. भानखेडा, तहसील), जुनैद मोहम्मद अब्दुल जावेद (वय २०, रा. हसनबाग, नंदनवन), निशिकांत सुखदेव मूल (वय ४०, रा. मानकापूर) आणि बारावीचा विद्यार्थी फरहान अख्तर फहीम अख्तर (वय १८, रा. ऑटोमोटिव्ह चौक, कपिलनगर) या चौघांना अटक केली. या प्रकरणात फरहान याला जामीन मिळाला आहे. तर अन्य तिघे न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात आहेत.
Nagpur News : अंगण झाडणाऱ्या महिलेला मोकाट वळूने उडवलं, घरासमोरच प्रकार, नागपूरकरांवर भीतीचं सावट
मंडळाचा अधिकारी रडारवर
संदीप व शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांमधील अल्ताफ हा महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगण्यात येते. पेपरफूट प्रकरण उघडकीस आल्यानंतर अल्ताफ हा फरार झाला. पोलिस मोबाइल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत. या पेपरफूट प्रकरणात शिक्षण मंडळाचा अधिकारीही पोलिसांच्या रडारवर आहे. प्रकरण उजेडात आल्यानंतर हा अधिकारी भूमिगत झाल्याचे सांगण्यात येते. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहे. त्याच्या चौकशीनंतर या पेपरफुटीत त्याचा सहभाग आहे किंवा नाही हे स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.
