छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागात अतिक्रमण हटवताना मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एमआयएमच्या १० माजी नगरसेवकांसह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध धडक मोहीम राबवली जात आहे. ही कारवाई सुरू असताना एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी आणि समर्थकांनी तेथे मोठ्या संख्येने जमाव जमवून मोहिमेला तीव्र विरोध केला. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कारवाई थांबवण्यासाठी या लोकप्रतिनिधींनी उपस्थित अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, त्यांच्यावर दादागिरी केली आणि त्यांना जीवे मारण्याची दमदाटी देखील केली. केवळ एवढेच नाही, तर या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या जमावाला प्रशासनाविरुद्ध भडकवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
सिटी चौक पोलिसांत कारवाई
महानगरपालिका अतिक्रमण उपायुक्तांच्या तक्रारीची दखल घेत सिटी चौक पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवणे, शासकीय कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून रोखणे आणि धमकावणे यांसारख्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Chhatrapati Sambhajinagar News : 300 ग्रामस्थांचा कला केंद्रात राडा, खुर्च्या तोडल्या, वाहने फोडली, नृत्यांगणा थोडक्यात बचावल्या
प्रशासनाचा इशारा
“शहरातील अतिक्रमणविरोधी मोहीम अशीच सुरू राहणार आहे. जे कोणी शासकीय कामात अडथळा आणतील किंवा अधिकाऱ्यांना दमदाटी करतील, त्यांच्यावर कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
‘त्या’ खुनाचा उलगडा
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन एमआयडीसी परिसरातील हमालवाडा येथे आढळलेला तरुणाचा मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचे तपासात उघड झाले. मराठवाडा स्पन पाईप कंपनीत चोरीच्या संशयावरून चार सुरक्षा रक्षकांनी एका अज्ञात तरुणाला बेदम मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश वक्ते, रोहित नगराळे, चंद्रकांत मारकळ आणि राहुल दुतोंडे यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही.
