• Sat. Jun 6th, 2026
    Nagpur Blast: नागपूर स्फोटातील मृतांचा आकडा 17 वर, प्रत्येक मृत कामगाराची DNA चाचणी होणार, दोन दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य

    Nagpur Raulgaon Blast: नागपूरच्या राऊळगाव येथील स्फोटक निर्मिती कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह पूर्णतः जळाल्याने त्यांची ओळख पटवण्यासाठी आता प्रशासनाने ‘डीएनए प्रोफाइलिंग’ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होणार असून मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

    काटोल तालुक्यातील स्फोटक निर्मिती कंपनीत भीषण स्फोट १७ ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटानंतर मृतांचा आकडा १७ वर पोहोचला असून अनेक कामगार जखमी झाले आहेत. एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत बारूद, डेटोनेटर आणि इतर स्फोटक साहित्य तयार केले जात होते. स्फोट इतका तीव्र होता की मृत कामगारांचे मृतदेह पूर्णतः जळून गेले असून त्यांची ओळख पटविणे अत्यंत कठीण झाले आहे.

    डीएनए चाचणी होणार

    या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत स्फोटातील प्रत्येक मृत कामगाराची डीएनए प्रोफाइलिंग चाचणी करण्याचे ठरविले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक मृतदेहांची स्थिती अत्यंत विद्रूप असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने ओळख पटविणे शक्य नाही. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले असून डीएनए तपासणीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पुढील दोन दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तोपर्यंत सर्व मृतदेह नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शीतगृहात ठेवण्यात येणार आहेत.

    DNA profiling of 17 workers killed in Nagpur blast
    नागपूरच्या एसबीएल कंपनीमध्ये झाला स्फोट

    डीएनए अहवाल आल्यानंतरच संबंधित कुटुंबियांकडे मृतदेह सुपूर्द केले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. जखमी कामगारांवर नागपूरमधील विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

    Maharashtra TimesChhatrapati sambhajinagar News : अतिक्रमण कारवाईत MIM ची ढवळाढवळ, अधिकाऱ्यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; 10 माजी नगरसेवकांवर गुन्हे

    मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

    घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेला अतिशय दुर्दैवी आणि दुःखद संबोधले. त्यांनी स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून मदतकार्याला वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच संबंधित तांत्रिक विभागांची पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. दरम्यान, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. “स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत करण्याची शासनाची भूमिका आहे.

    DNA profiling of 17 workers killed in Nagpur blast
    नागपूर राऊळगाव स्फोटातील सर्व मृतांची डीएनए चाचणी केली जाणार आहे.

    मात्र या दुर्घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत तपासात त्रुटी राहणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित कंपनीने सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याची कसून चौकशी केली जाईल.

    Maharashtra TimesPOSH Audit : राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये 30 दिवसांत ‘पॉश ऑडिट’, अन्यथा कारवाई; महिला आयोगाचे निर्देश

    जिल्ह्यात शोककळा

    सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमित तपासण्या करण्याबाबत चर्चा होणार आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून तातडीची मदत आणि पारदर्शक तपास हीच आता नागरिकांची अपेक्षा आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा