मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमानसेवेला बसताना दिसत आहे. युद्धामुळे अनेक विमानांचे उड्डाण अनिश्चित काळासाठी रद्द झाले आहेत. यामुळे अनेक भारतीय UAE मध्ये विमानतळावर अडकून पडले आहेत. यामुळे रायगड आणि नीव मुंबईकरांचादेखील समावेश आहे.
संघर्ष तीव्र झाल्यानंतर विमान कंपन्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, परतीच्या प्रवासाची तयारी करून विमानतळावर पोहोचलेले अनेक प्रवासी अचानक अनिश्चिततेत सापडले. काही जण हॉटेलमध्ये तात्पुरती व्यवस्था करून थांबले आहेत, तर काही प्रवासी विमानतळ परिसरातच परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहेत. सोशल मीडियावरून संपर्क साधत आपल्या कुटुंबियांना धीर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, लष्करी हालचाली आणि प्रतिहल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आखातातील हवाई क्षेत्र अत्यंत संवेदनशील झाले आहे. इराणकडून अमेरिकन तळांना लक्ष्य केल्याच्या वृत्तांनंतर तणाव आणखी वाढल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. भारतासह विविध देशांतील हजारो प्रवाशांच्या प्रवासावर याचा परिणाम झाला आहे.
दरम्यान, UAE मधील भारतीय दूतावास आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती मिळत आहे. अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून आवश्यक ती मदत पुरविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उड्डाणे पूर्ववत करण्याचे नियोजन असल्याची माहितीही समोर येत आहे.
रायगड आणि नवी मुंबईतील कुटुंबीयांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे. आपल्या नातेवाईकांची सुरक्षितता आणि परतीचा प्रवास कधी सुरू होणार याबाबत सर्वांच्या नजरा अधिकृत घोषणांकडे लागल्या आहेत. केंद्र शासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परदेशात असलेल्या भारतीयांनी स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासाशी संपर्कात राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मध्यपूर्वेतील या युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद किती काळ उमटणार, हे अद्याप स्पष्ट नसले तरी सध्या तरी प्रवाशांसाठी प्रतीक्षेचीच परीक्षा सुरू आहे.
