नागपूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत आणि त्यांच्या निधनावरून सुरू असलेल्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर पडदा टाकण्याचे संकेत दिले आहेत. “माझी हात जोडून विनंती आहे, मी आजपासून या विषयावर बोलणे बंद केले,” असे स्पष्ट करत त्यांनी या मुद्द्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. अजित पवार यांच्या अपघाताबाबत यापुढे आपण बोलणार नाही. या विषयावर सातत्याने चर्चा होत असून त्यातून अनेक गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, मी आजपासून या विषयावर बोलणे बंद केले, असे सुळे म्हणाल्या.
देशातील शिक्षण व्यवस्थेबाबत सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. विद्यार्थ्यांनी बारावीचा अभ्यास करायचा की नीट आणि सीईटीची तयारी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी नेमक्या किती परीक्षा द्यायच्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बारावी, नीट आणि सीईटी अशा विविध परीक्षांच्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थी आणि पालक नाहक भरडले जात आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांना महागडे शिक्षण परवडणार कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही शिक्षणाचे राजकारण करत नाही. हा विषय अत्यंत गांभीर्याने घेत आहोत, असे त्या म्हणाल्या.
नागपुरात डीजेबाबत नियम आणि कायदे काटेकोरपणे लागू केले जात असतील, तर तेच नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू का केले जात नाहीत, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात स्वतः लक्ष घालून नियमांची अंमलबजावणी करावी, सण उत्सव साजरे करण्यास आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत त्या म्हणाल्या की, सण साजरे झालेच पाहिजेत, कारण ती आपली संस्कृती आहे, मात्र उत्सव कायद्याच्या चौकटीत झाले पाहिजेत. रात्री दहा वाजल्यानंतर डीजे वाजवू नये आणि आवाजाची मर्यादा पाळावी, हा नियम आम्ही केलेला नसून न्यायालय आणि प्रशासनाचा आदेश असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील डीजे मोर्चाबाबत बोलताना त्यांनी वाद टोकाला गेल्याचे सांगितले. आगामी काळात मोठे सण असल्याने सर्व संबंधितांना एकत्र बोलावून समंजसपणे मार्ग काढण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते; मात्र पुण्याबाबत सातत्याने चुकीच्या आणि वाईट घटनांच्या बातम्या येत आहेत. वर्दीची भीती कुणालाच राहिली नाही, याची चिंता वाटते, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी डीजेवर नाचत असल्याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. नाचण्याला कोणाचाही विरोध नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि प्रशासनाचे नियम पाळले पाहिजेत. नागपुरात डीजेवर बंदी लागू होऊ शकते, तर संपूर्ण महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नियमांची अंमलबजावणी करावी, असे त्या म्हणाल्या. कुणावर हात उगारण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि त्याला शांततेच्या मार्गाने उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांचा आंदोलनाबाबतीत बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मराठा, ओबीसी, आदिवासी तसेच महिलाही विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या प्रश्नावर आंदोलन सुरू असल्याचे चित्र आहे. राज्यात 200 आमदारांचे सरकार असूनही आंदोलन कमी होत नाहीत, याचा अर्थ काहीतरी चुकत आहे. सरकारने आत्मचिंतन करून संबंधित घटकांशी संवेदनशीलपणे चर्चा करावी, असे त्या म्हणाल्या.
मराठा आणि ओबीसी समाजातील वाढत्या तेढीला सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचेच सरकार असल्याचे सांगत सरपंचापासून पंतप्रधानांपर्यंत सत्ता त्यांच्याकडे आहे. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार आहे. समाजात तेढ निर्माण होत असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा