• Sat. Mar 7th, 2026
    Accident News: टायर पंक्चर झाल्याने टेम्पो उभा होता, पाठीमागून कारची जोरदार धडक; 2 वर्षांच्या चिमुरड्यासह 3 जण दगावले

    पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज येथे भीषण अपघात झाला आहे. टायर पंक्चर झाल्यामुळे उभ्या असलेल्या टेम्पोला इको गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली.

    पुणे-सोलापूर महामार्गावर डाळज येथे भीषण अपघात तीन ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    दीपक पडकर, इंदापूर : इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 2 येथील सोलापूर–पुणे महामार्गावर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातात इको गाडीतून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आदिती अमर हातेकर (वय 25 वर्षे), सखुबाई ईश्वर गेजगे (वय 60 वर्षे) व जय अमर हातेकर (वय 2 वर्षे), सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर यांचा समावेश आहे. जय हातेकर हा चिमुकलाही या अपघातात दगावला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड निराशा पसरली आहे.

    चालकावर उपचार सुरु

    अपघातात इको गाडीचे चालक कबीरदास ईश्वर गेजगे (वय 50 वर्षे, रा. पाटस) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच स्वाती कबीरदास गेजगे (वय 34 वर्षे) व समृद्धी कबीरदास गेजगे (वय 10 महिने), दोघीही रा. पाटस या किरकोळ जखमी झाल्या आहेत.या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर–पुणे लेनवरून जाणारा आयशर टेम्पो (एम एच 13 सीयु 5163) याचा टायर अचानक पंचर झाल्याने वाहन चालकाने तो टेम्पो महामार्गाच्या साईडला अर्धवट आणि धोकादायक स्थितीत उभा केला होता.

    Maharashtra TimesSunetra Pawar: कंठ दाटला, हुंदका आवरला! ‘विचारांचा वारसा शेवटपर्यंत जपणार’; अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण

    दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या इको (एम एच 12 एक्स ई 8816) या चारचाकी वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली.

    मदतकार्य आणि गुन्हा प्रक्रिया

    घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा