• Sat. Mar 14th, 2026

    Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी जुनाच मार्ग? तीव्र विरोधानंतर तोडगा काढण्याची घोषणा; कसा असेल मार्ग?

    Pune-Nashik Railway: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी जुनाच मार्ग? तीव्र विरोधानंतर तोडगा काढण्याची घोषणा; कसा असेल मार्ग?

    Pune-Nashik Semi-Highspeed Railway: पुणे नाशिक रेल्वेच्या नवीन मार्गाला होणाऱ्या विरोधानंतर जुन्याच मार्गावर प्रकल्प विकसित करता येईल का याचा अभ्यास सुरू होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रशांत आहेर, मुंबई: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग अहिल्यानगर-शिर्डीमार्गे नेण्यासाठी सर्व स्तरांतून तीव्र विरोध होत असल्याने पुन्हा जुन्या मार्गानेच पुणे-नाशिक रेल्वे विकसित करता येईल का, याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केले. नारायणगाव येथील ‘जायन्ट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कॉप’च्या संरक्षित क्षेत्राला (बफर झोन) धोका निर्माण होणार नाही आणि जुन्या मार्गावरील महत्त्वाची गावे निसटणार नाहीत, अशा पद्धतीने तज्ज्ञ सल्लागाराकडून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले.

    विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी या प्रकल्पातील अडचणी स्पष्ट केल्या; तसेच राज्य सरकारची भूमिका तुमच्यापेक्षा वेगळी नाही, अशी ग्वाही देतानाच, रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करून तीन ते चार महिन्यांत सल्लागाराकडून योग्य मार्ग कसा काढता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट केले.

    Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: वसई-विरारमधून जाणार बुलेट ट्रेन, विरार स्थानकाचा कायापालट; कसा होणार विकास?

    काय आहे मुख्य अडथळा?

    पुणे-नाशिक रेल्वे मार्ग हा नाशिक-सिन्नर-संगमनेर-अकोले-नारायणगाव-मंचर-चाकण या भागातून प्रस्तावित होता. मात्र, नारायणगाव परिसरात ३२ देशांच्या सहभागातून चालणारी जागतिक स्तरावरील ‘जीएमआरटी’ वेधशाळा आहे. रेल्वेच्या लहरींमुळे या वेधशाळेच्या कामात अडथळा येऊ शकतो, असे सांगून केंद्र सरकारने या मार्गाला लेखी नकार दिला आहे. केंद्र सरकारची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट करून पर्यायी मार्गाचाच विचार करावा लागेल, असे सांगितले.

    असा निघणार तोडगा

    • रेल्वे मंत्रालय आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी आग्रह धरणार
    • सल्लागारांकडून ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीत पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी योग्य मार्ग कोणता, याचा अहवाल घेणार
    • वेधशाळेचे नियम पाळून आणि प्रस्तावित मूळ रेल्वेमार्गात फार बदल न करता (डेव्हिएशन) सर्व गावे रेल्वेशी ‘कनेक्ट’ होण्याच्या दृष्टीने अभ्यासाअंती निर्णय घेणार

    Maharashtra TimesMumbai-Navi Mumbai Airport Metro: ‘मेट्रो लाइन 8’ला सरकारची मंजुरी, एकूण 20 स्थानकं; दोन्ही विमानतळ जोडणारी मार्गिका कधी सुरू होणार?

    शिर्डी पर्यायाला विरोध का?

    • शिर्डीमार्गे गेल्यास प्रवासाचा वेळ किमान ३० मिनिटांनी वाढणार आहे.
    • जुन्या प्रस्तावित मार्गावरील संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, चाकण यासारखी महत्त्वाची ठिकाणे रेल्वे नकाशावरून बाद होतील.
    • मार्ग बदलण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध असून गावोगावी कृती समित्या, आंदोलने होत आहेत.
    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा