• Wed. Mar 11th, 2026

    Farmer Success Story: महिला शक्तीची कृषी क्षेत्रात दमदार कामगिरी; भाजीपाला, फळबाग आणि कृषी पर्यटनातून मिळवलं यश; वर्षाला 18 लाखांची कमाई

    Farmer Success Story: महिला शक्तीची कृषी क्षेत्रात दमदार कामगिरी; भाजीपाला, फळबाग आणि कृषी पर्यटनातून मिळवलं यश; वर्षाला 18 लाखांची कमाई

    Karjat Farmer Success Story: पारंपारिक शेतीतून भरगोस उत्नपन्न कमवून छाया वेखंडे या एक आदर्श ठरत आहेत. भाजीपाल, फळबाग, मत्स्यपालन आणि कृषी पर्यटनातून त्या वर्षाभरात 18 लाखांचं उत्पन्न कमवत आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन , रायगड: कर्जत तालुक्यातील वदप येथील छाया विनया वेखंडे यांनी पारंपरिक शेतीतून आधुनिकतेकडे वाटचाल करत बहुआयामी शेतीचा आदर्श उभा केला आहे. भाजीपाला, फळबाग, मत्स्यपालन आणि कृषी पर्यटन यांची प्रभावी सांगड घालत त्यांनी आठ एकर शेतीत नंदनवन फुलवले असून त्यांचे यश आज परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

    आधुनिक ‘पॅक हाऊस’

    रब्बी व उन्हाळी हंगामात त्यांच्या शेतात भेंडी, वाल, हरभरा, कलिंगड, कांदा, टोमॅटो आणि विविध वेलवर्गीय भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. प्लास्टिक आच्छादन आणि मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तण नियंत्रण साधले गेले असून पिकांचा दर्जाही उंचावला आहे. उत्पादनाची प्रतवारी आणि साठवणूक सुलभ व्हावी म्हणून आधुनिक ‘पॅक हाऊस’ उभारण्यात आले आहे. कृषी यांत्रिकीकरणाचा प्रभावी वापर करून मजुरांवरील अवलंबित्व कमी करत उत्पादनक्षमता वाढवण्यात त्यांनी यश मिळवले आहे.

    farmer success story

    आंबा बागेत ८० काळी मिरीची रोपे लावून उपलब्ध जागेचा शंभर टक्के वापर साधला आहे. ‘मागेल त्याला काजू कलमे’ या योजनेतून ५० काजू कलमांची लागवड करून भविष्यातील शाश्वत उत्पन्नाचा पाया रचला आहे. मत्स्यपालनाची जोड देत उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्यात आले आहेत. विविधतेतून समृद्धीकडे जाणारा हा प्रवास त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो.

    कृषी पर्यटन

    कृषी पर्यटनामुळे शहरी भागातील पर्यटकांना ग्रामीण संस्कृतीचा अनुभव आणि ताज्या फळांची चव घेण्याची संधी मिळत आहे. आंबा विक्री आणि पर्यटनातून वर्षाकाठी सुमारे 18 लाख रुपयांची उलाढाल होत असून शेती हा तोट्याचा व्यवसाय नसून योग्य नियोजन केल्यास तो नफ्याचा मार्ग ठरू शकतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

    female farmer success story

    सरकारी योजनांचा प्रभावी वापर, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे वदपची ही शेती आज आदर्श केंद्र म्हणून ओळखली जात आहे. कृषी अधिकारी दिनेश कोळी, उपकृषी अधिकारी शशिकांत गोसावी तसेच सचिन केणे आणि किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे या प्रयोगांना बळ मिळाले आहे.

    महिला शक्तीची ही दमदार कामगिरी केवळ आर्थिक यशापुरती मर्यादित नसून परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी ठरत आहे. शेतीत नव्या प्रयोगांची यशोगाथा रचत छाया वेखंडे यांनी आपले यश गगनाला भिडवले असून कर्जत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा