• Sat. Sep 12th, 2026

Shivsena News: महायुतीत नाराजीचा भडका; जाहीर सभेत दोन मंत्र्यांसमोरच शिवसेनेच्या आमदाराला कोसळले रडू

महेश पाटील, नंदुरबार : निधी वितरणात अन्याय होत असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मेळाव्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोलून दाखवली. ‘जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असूनही कार्यकर्त्यांना न्याय देता येत नाही. त्यामुळे त्यांना न्याय द्यायचा कसा’? असा सवाल करत शिवसेनेच्या दोन मंत्र्यांसमोरच शिंदे शिवसेनेचे आमदार रघुवंशी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सत्ताधारी महायुतीतील आमदारालाच जाहीर सभेत रडू कोसळल्याने या प्रसंगाची राज्यभर चर्चा होत आहे.

विकासकामांसाठी निधी मिळत खंत

नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात काल गुरुवारी शिवसेना संघटनात्मक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेना लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची बाब उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.

‘शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही’

यावेळी रघुवंशी यांनी निधी वितरणाच्या बाबतीत अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करताना सांगितलं की, “जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असून शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. शासनाच्या निकषानुसार विधानसभेच्या आमदाराला 20 टक्के निधी, पालकमंत्र्यांना 30 टक्के निधी वितरित करण्यात येतो. आमदारांच्या शिफारशीने पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी द्यावा. जेणेकरून जिल्हा नियोजन समितीचा निधी मिळेल. जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. परंतु, सेना लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघात विकास कामे व्हायला पाहिजे, त्यामुळे निधी वितरणाच्या बाबतीत शासनाने फेरविचार करावा,” अशी मागणी त्यांनी केली.

मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील यांचा मित्रपक्षांना इशारा

शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केल्यानंतर, ‘शिवसैनिकांच्या जीवावर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आहे. एकीकडे शिवसेना वाढत असताना मात्र मित्र पक्षच जर शिवसैनिकांवर अन्याय करत असेल, तर ते कदापी खपवून घेतलं जाणार नाही’, असा थेट इशारा उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप व राष्ट्रवादीला लगावलेला आहे. ‘निंदकाचे घर असावी शेजारी’ या म्हणीप्रमाणे शिवसेनेवर टीका करत मग्न रहावं यातच आमचा फायदा असल्याचा टोला देखील दोन्ही मंत्र्यांनी शिवसेना संघटनात्मक मेळाव्यात लगावला.

‘शिवसैनिकांनी काळजी करू नये’

यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की, “जिल्ह्यात शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेनेची ताकद एक नंबर आहे. शिवसैनिकांनी काळजी करू नये. या जिल्ह्याचे आमदार आहेत, तसंच मी आणि मंत्री गुलाबराव पाटील आहोत. शिवसैनिकांच्या अडीअडचणी, त्यांच्या व्यथा काय आहेत याची जाणीव असून, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ. जिल्ह्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आमदार चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेना वाढवत आहेत. शिवसेना जरी महायुतीत काम करत आहे, तरी मित्रपक्ष शिवसैनिकांवर का अन्याय करत आहे?’ असा सवालही सामंत यांनी यावेळी केला.

‘नंदुरबार काय पाकिस्तानात आहे का?’

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यात निधी वितरणाच्या बाबतीत पालकमंत्र्यांवर प्रश्न उपस्थित केला. याअगोदरच निधी वितरणाचं ठरलं आहे. मी देखील जळगावचा पालकमंत्री असताना त्याठिकाणी सर्व लोकप्रतिनिधींना निधी देत असतो. नंदुरबार काय पाकिस्तानात आहे काय? असा खडा सवाल उपस्थित करून पालकमंत्र्यांना विधान परिषद आमदारांना निधी द्यावाच लागेल. नियम सर्वांना सारखाच आहे. जे कायदे करणार तेच कायदे तोडणार काय? असं गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.