Solapur Crime News: सोलापूरच्या इंगळगी गावात जावयाने सासऱ्याचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून आणि घटस्फोटाच्या रागातून आरोपी सादिक दफेदारने हे टोकाचे पाऊल उचलले असून….
संशयाचे जाळे आणि घरगुती वाद
सिकंदर शेख यांना चार मुली आणि दोन मुले आहेत. यामधील दुसऱ्या क्रमांकाची आणि तिसऱ्या क्रमांकाची मुलगी एकाच घरात म्हणजेच पानमंगरूळ (दक्षिण सोलापूर) गावात दिली आहे. संशयित आरोपी सादिक दफेदार हा तिसऱ्या क्रमांकाचा जावई होता. सादिकची पत्नी मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. लग्नानंतर सादिक हा पोलीस पत्नीवर संशय घेत होता. काही महिने सादिक दफेदार हा पत्नीसोबत मुंबईत राहत होता. मुंबईत देखील सादिक हा पोलीस पत्नीवर संशय घेऊन मारहाण करत असे.
समजुतीचे प्रयत्न आणि घटस्फोटाचा खटला
सादिकचे सासरे सिकंदर शेख यांनी अनेकदा बैठका घेऊन जावई सादिक दफेदारची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. मागील वर्ष-दीड वर्षांपासून संशयित आरोपी जावई सादिक दफेदार याने राग धरला होता. पोलीस पत्नीलाच खलास करतो, अशी अनेकदा त्याने धमकीही दिली होती. सिकंदर शेख यांनी जावयाला मुलीपासून लांब केले होते आणि घटस्फोटासाठी मुलीमार्फत खटला दाखल केला होता. याचाच राग मनात धरून २४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपी जावई सादिक दफेदार याने सासऱ्याचा गळा चिरून हत्या केली. यात सिकंदर शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
Ambadas Danve : ‘ड्रायव्हरच्या नावे 1150 कोटी रुपये हडपण्याचा भुमरेंचा डाव’; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
शेतात गाठले आणि केला खुनी हल्ला
इंगळगी गावातील शेतातच जावई सादिक याने सासरे सिकंदर शेख यांची गळा चिरून हत्या केली. आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तडफडत असलेल्या सिकंदर यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी सादिक दफेदार याने स्वतःवर चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. इंगळगी गावातील ग्रामस्थांनी ताबडतोब वळसंग पोलीस स्टेशनला कळविले.
Latur News : गाडीच्या नुकसानीचा संशय अन् 32 मुलांवर तुटून पडला शिक्षक; अहमदपूरच्या नामांकित शाळेतील संतापजनक प्रकार
पोलिस कारवाई आणि सद्यस्थिती
पोलिसांनी सादिक व सिकंदर या दोघांना बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, सिकंदर (सासरा) यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. सादिक (जावई) याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
