• Sat. Jun 20th, 2026
    Ambadas Danve : ‘ड्रायव्हरच्या नावे 1150 कोटी रुपये हडपण्याचा भुमरेंचा डाव’; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

    सत्ताधारी खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्या चालकाच्या माध्यमातून ११५० कोटींचा समृद्धी जमीन घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. जन्माच्या १४ वर्षे आधीच जमिनीचा व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    जटवाडा येथील २३ एकर जमिनीच्या संपादनातून महाघोटाळ्याचा दानवेंचा आरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: सत्ताधारी पक्षाचे खासदार संदिपान भुमरे यांनी आपल्या चालकाच्या माध्यमातून सरकारी तिजोरीवर ११५० कोटी रुपयांचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. जटवाडा येथील २३ एकर जमिनीच्या संपादनातून हा महाघोटाळा रचला गेल्याचा दावा दानवे यांनी पुराव्यांसह केला आहे.

    नेमके प्रकरण काय?

    छत्रपती संभाजीनगरमधील जटवाडा परिसरात २३ एकर ३० गुंठे जमीन आहे. ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केली असून, या जमिनीला कोणताही कायदेशीर वारसदार नव्हता. समृद्धी महामार्गासाठी ही जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश झाल्यानंतर, या जमिनीचे संपादन मूल्य तब्बल ११५० कोटी रुपये निश्चित करण्यात आले.

    खासदाराच्या ड्रायव्हरच्या नावावर जन्मापूर्वीच जमीन?

    या जमिनीचे मूल्य ठरल्यानंतर अचानक काही व्यक्तींनी या जमिनीचे मालक असल्याचा दावा केला. त्यांनी ही जमीन मुस्लिम पद्धतीनुसार (हिबानामा) जावेद रसूल शेख यांच्या नावावर केल्याचा दावा केला आहे. अंबादास दानवे यांनी यातील सर्वात मोठा तांत्रिक घोटाळा उघड केला आहे. १९७१ मध्ये हा व्यवहार झाल्याचे कागदोपत्री सांगितले जात आहे. दानवे यांच्या दाव्यानुसार, ज्याच्या नावावर ही जमीन झाली, त्या जावेद रसूल शेख यांचा जन्म १९८५ मध्ये झाला आहे. जर व्यक्तीचा जन्म १९८५ चा असेल, तर त्याच्या नावावर त्याच्या जन्माच्या १४ वर्षे आधी (१९७१ मध्ये) हिबानामा कसा होऊ शकतो?

    Maharashtra TimesDombivli News: नर्सच्या अबोल्यामुळे डोंबिवलीच्या डॉक्टरचे टोकाचे पाऊल; 10 बिअर आणि 45 गोळ्यांचे सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न

    खासदार भुमरेंवर थेट निशाणा

    जावेद रसूल शेख हा खासदार संदिपान भुमरे यांचा चालक असून, त्याच्या माध्यमातून ११५० कोटी रुपये हडपण्याचा भुमरेंचा डाव असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, याच चालकाच्या नावावर यापूर्वीही ४०० कोटींचे दुसरे एक हिबानामा प्रकरण समोर आले होते. हे सर्व प्रकार खासदारांच्याच आशीर्वादाने आणि नियोजनाने होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

    Maharashtra TimesLatur News : गाडीच्या नुकसानीचा संशय अन् 32 मुलांवर तुटून पडला शिक्षक; अहमदपूरच्या नामांकित शाळेतील संतापजनक प्रकार

    या महाघोटाळ्याबाबत अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना सविस्तर पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाची तातडीने सीआयडी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली असून, या चौकशीतून भुमरे यांचे सर्व कारनामे बाहेर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा