• Sat. Jun 13th, 2026
    Ratnagiri Crime : विम्याच्या रकमेसाठी मृतकाच्या नातेवाईकांना कागदपत्रांची गरज, PSI ने 25 हजार मागितल्याचा आरोप

    रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

    प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षकानेच तब्बल 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने मोठी कारवाई केली आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पोलीस उपनिरीक्षकच्या सांगण्यावरून त्यांच्या सहकाऱ्याला 15000 रुपयाची लाच घेताना रंगेहात सापडल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे यांच्यासह अन्य इसम अभिजीत शिर्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणात एका मृतकाच्या वारसदारांना विमाची रक्कम हवी होती. पण ही रक्कम मिळवण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करावा लागतो. त्यासाठी अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल आणि डीओआर फॉर्म लागतो. याबाबतचे कागदपत्रे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मनिष कांबळे यांनी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, असा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदारांनी 23 जानेवारीला तक्रार दिली होती.

    तक्ररदारांनी तक्रार दिल्यानंतर दोन पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी पडताळणीत आरोपी मनिष कांबळे यांनी तक्रारदारांना कागदपत्रे देण्यासाठी तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच मागितली. यासाठी मनिष कांबळे यांनी खाजगी इसम अभिजित प्रकाश शिर्के यांच्याकडे लाचेची रक्कम देण्याबाबत फोनवर सांगितलं.

    मनिष कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदारांनी खाजगी इसम अभिजित प्रकाश शिर्के यांचे चिपळूण पोलीस स्टेशन जवळ असलेल्या सोमेश्वर जनरल स्टोअर्स या दुकानात जावून त्यांची भेट घेतली. त्यावेळी खाजगी इसम शिर्के यांनी त्यांच्या फोनद्वारे मनिष कांबळे यांना संपर्क साधला. त्यांचे दोघात बोलणे झाल्यानंतर अभिजित शिर्के यांनी तक्रारदार यांच्याकडे फोन दिला. यावेळी मनिष कांबळे यांनी लाच रक्कम अभिजित शिर्के यांच्याकडे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी लाच रक्कम 15 हजार रुपये ही खाजगी इसम यांच्याकडे पंचासमक्ष दिली.

    ती लाच रक्कम खाजगी इसम यांनी लोकसेवक यांच्या सांगण्यावरुन मनीष कांबळे यांच्याकरता आणि स्वतःच्या आर्थिक फायद्याच्या उद्देशाने तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष स्विकारली म्हणून अभिजित शिर्के यांना पंचासमक्ष लाच रक्कमेसह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परीक्षेत्र, ठाणे, भागवत, सोनावणे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परीक्षेत्र, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली अविनाश पाटील, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांचे पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, उदय चांदणे, पोलीस संजय वाघाटे, विशाल नलावडे, दिपक आंबेकर, राजेश गावकर, हेमंत पवार, वैशाली धनवडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी केली आहे. या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा