मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मराठवाड्यातील हवामानात बदल झाला आहे. सोमवारी पहाटे मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले. बीडसह अन्य जिल्ह्यांत ढगाळ वातावरण होते. दरम्यान सोमवारी रात्री धाराशिवमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी धाराशिव शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. उमरगा तालुक्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. त्याचा जनजीवनावर परिणाम दिसून आला.
धाराशिव जिल्ह्यात रब्बीची पिके काढणीच्या अवस्थेत आहेत. त्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात पुढील २४ तासांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, चाकूर तालुक्यात रविवारी मध्यरात्री व सोमवारी सकाळी पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात सोमवारी दुपारी चार ते पाचच्या सुमारास गारपीट झाली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारीचे काही प्रमाणात नुकसान झाले. परभणी शहरात गंगाखेड, पालम तालुक्यांतील काही भागात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काढणीला आलेल्या रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे.
सोमवारी सकाळपासून कडक ऊन होते. दुपारी बारानंतर वातावरणात बदल झाल आणि तीनच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील आनंदवाडी, चाटोरी, बोरगाव, बंदरवाडी, खडी, नाव्हा, नाव्हलगाव, कांदलगाव या गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. नांदेड, हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
अनेक राज्यांना अलर्ट
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 10 राज्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. फक्त पाऊसच नाही तर या राज्यांमध्ये वाऱ्याचा वेग हा प्रतीसात 30 ते 40 किमी असा असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम, आसाम, मेघालय, तेलंगणा या राज्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा