साताऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. एक सराफ दुकानदार दुकान उघडत असताना अचानक आलेल्या चोरट्यांनी सोने-चांदीची बॅग पळवून नेली आहे. विशेष म्हणजे भर दिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील उंब्रज हे मध्यवर्ती बाजारपेठचे ठिकाण आहे. कराड आणि पाटण तालुक्यातील लोकांचा या बाजारपेठेशी संबंध येतो. या ठिकाणी उपनिबंधक कार्यालय असून नुकतेच अप्पर तहसील कार्यालय देखील मंजूर झाले आहे. उंब्रजला स्वतंत्र पोलीस स्टेशन आहे. सोमवारी उंब्रजचा आठवडी बाजार असतो आणि बाजाराच्या दिवशी सकाळी चोरीची घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज-चोरे रस्त्यालगत गणेश यादव यांचे श्री वाग्देवी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान दुकान उघडण्यासाठी ते स्कुटीवरून आले. गाडी एका शेडमध्ये उभी केली. दागिने आणि रोकड असलेली बॅग स्कुटीवर ठेऊन ते दुकानचे कुलूप काढायला गेले. मात्र, कुलपाच्या होलमध्ये कसला तरी पदार्थ भरलेला होता. त्यामुळे त्यांना कुलूप निघत नव्हते.
हीच संधी साधून दोन चोरटे मोटरसायकलवरून स्कुटी लावलेल्या शेडजवळ आले. एकाने स्कुटीवरील बॅग उचलली आणि पळत जाऊन मोटरसायकलवर बसला. त्यानंतर दोन्ही चोरटे मोटरसायकलवरून पसार झाले. ८ तोळे सोने, ५ किलो चांदी आणि २ लाख रुपयांची रोकड, असा ऐवज असलेली बॅग चोरट्यांनी लांबवल्याने दुकानदार घामाघूम झाला. या घटनेची माहिती त्यांनी तातडीने उंब्रज पोलिसांना दिली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
उंब्रज पोलिसांनी सातारचे पोलीस अधीक्षक, कराड उपविभागाच्या डीवायएसपी तसेच स्थानिक गुन्हे शाखेला घटनेची माहिती कळविली. एलसीबीचे पथक आणि श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चोरटीत ज्या मार्गाने पसार झाले त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतली आहेत. चोरीची पद्धत पाहता दोन-तीन दिवस पाळत ठेवून चोरट्यांनी चोरी केली असावी. तसेच दोन पेक्षा अधिक संशयतांचा या गुन्ह्यात सहभाग असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचा चोरीचा छडा लावून संशयितांना लवकरच गजाआड करू, असा विश्वास एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी व्यक्त केला आहे.
