Khandala Ghat Accident: या अपघातानंतर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी कोचीहून गुजरातला प्रोपलीन या ज्वलनशील गॅस घेऊन जाणाऱ्या टँकर (क्रमांक- एनएल-०१/एएफ-५०४०) चालकाचे खंडाळा घाटातील अमृत अंजन पुलाजवळील तीव्र उतार व वळणावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर मार्गालगत असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले सिमेंटचे दुभाजक तोडून मार्गालगतच्या गटारात जाऊन अडकला अन् मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच अपघातस्थळापासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील, निलेश सरोदे, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे, रसायनतज्ज्ञ धनंजय गीध यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवली आणि युद्धपातळीवर अपघातग्रस्त गॅस टँकर हटवण्याची मोहीम सुरू केली. अर्धा तासात अपघातग्रस्त गॅस टँकर क्रेनच्या सहाय्याने सुरक्षितपणे हटवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला.
अपघातग्रस्त गॅस टँकर हटवल्यानंतर काही वेळाने मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली. या घटनेचे वृत्त समजताच सर्वत्र पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. २० दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताच्या घटना पुन्हा ताज्या झाल्या होत्या. त्यावेळच्या परिस्थितीचे चित्र सर्व प्रशासन, यंत्रणा आणि प्रवाशांच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. अपघात किरकोळ असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ३ फेब्रुवारीला प्रोपलीन गॅसची वाहतूक करणाऱ्या टॅंकरच्या अपघातामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आणि जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर अभूतपूर्व अशी ३८ तास वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातानंतर उद्भवलेल्या अभूतपूर्व वाहतूक, त्यामुळे झालेल्या समस्यांचे परीणाम, पडसाद पुन्हा उमटू लागले होते. मात्र सुदैवाने मागच्या गॅस टँकरप्रमाणे हा गॅस टँकर मार्गावर उलटला नाही. अन्यथा पुन्हा एकदा ३ फेब्रुवारीला झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती झाली असती.
