मुंबई – ललिता पिल्लेवार
‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने या चित्रपटाला प्रचारकी असल्याचं म्हणत ‘पूर्णपणे बकवास’ अशी टीका केली होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये एक मुस्लीम कुटुंब अभिनेत्रीला बळजबरीने गोमांस खायला देतात, त्यावर अनुरागने प्रतिक्रिया दिली होती. गोमांस तर दूर राहिलं पण कोणी अशाप्रकारे कोणाला खिचडीसुद्धा बळजबरीने खायला घालत नाही, असं तो म्हणाला होता. यावरून आता ‘द केरळ स्टोरी 2’चे दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी अनुराग कश्यपला सडेतोड उत्तर दिलं आहे. कामाख्या यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी अनुरागला मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याची टीका केली आहे.
ते पुढे म्हणाले, “अनुराग कश्यपने म्हटलंय की कोणीच कोणाला अशाप्रकारे खिचडीसुद्धा देत नाही. मी पूर्णपणे सहमत आहे. कोणीच कोणाला अशाप्रकारे लाडूसुद्धा भरवू शकत नाही. परंतु दुर्दैवाने आपल्या समाजात आपल्याच निरागस मुलींचं धर्मांतर करण्यासाठी त्यांना बळजबरीने गोमांस खायला दिलं जातंय. हा एक गुन्हा आहे. समस्या अशी आहे की अनुराग कश्यप आता मानसिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. त्याला प्रत्येक गोष्टीशी समस्या आहे, ब्राह्मणांशी, नेटफ्लिक्सशी, फिल्म इंडस्ट्रीशी. एखाद्या माणसाला प्रत्येक गोष्टीशी समस्या कशी असू शकते?”
https://twitter.com/kamakhyanarayan?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2025574565796298972%7Ctwgr%5Ee0fdc2b2a878ca231855279f9e69df4ffe4bba6a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fentertainment%2Fthe-kerala-story-2-director-kamakhya-narayan-singh-calls-anurag-kashyap-mentally-weak-clarifies-on-beef-scene-1612081.html
“अनुरागने एक चित्रपट बनवला होता, दॅट गर्ल इन यलो बूट्स.. ज्यामध्ये एका वडिलांचे लेकीसोबत अनैतिक संबंध दाखवले होते. हे एका सभ्य समाजाच्या विचारांच्या पलीकडचं आहे. परंतु अनुराग मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत आणि समाजाने आता त्याच्याकडे गांभीर्याने पाहणं सोडून दिलं आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. मी देवाकडे प्रार्थना करतो की त्याला अक्कल द्यावी. द केरळ स्टोरी 2 हा चित्रपट तथ्यांवर आधारित आहे”, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘प्रिय अनुराग सर, मुद्दा चित्रपटातील दृश्यांचा किंवा खिचडी, गोमांसचा नाहीये. तर खरा प्रश्न संमती आणि बळजबरीचा आहे. तुम्ही एखाद्याला त्यांच्या इच्छेविरुद्ध खिचडी खाण्यास भाग पाडू शकत नाही. त्यामुळे जर एखादा चित्रपट बळजबरीने धर्मांतर किंवा दबावाचा मुद्दा उपस्थित करत असेल, तर त्याविरोधात द्वेष पसरवणं हा बौद्धिक अप्रामाणिकपणा आहे. वादविवाद हा तथ्ये आणि आकडेवारीवर आधारित असावा.’
