Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेच्या एकूण ३७ जागांसाठी मार्चमध्ये निवडणूक होणार आहे. यातील ७ जागा महाराष्ट्रातील आहे. पैकी ४ जागा भाजप जिंकू शकेल.
शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस शप), फौजिया खान (राष्ट्रवादी काँग्रेस शप), रजनी पाटील (काँग्रेस), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना उबाठा), रामदास आठवले (रिपाईं-आठवले), धैर्यशील पाटील (भाजप), भागवत कराड (भाजप) या सात जणांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपेल. रामदास आठवले केंद्रात मंत्री आहेत. ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर आहेत. दलित चेहरा असल्यानं त्यांना पुन्हा संधी मिळू शकते. त्यानंतरही भाजप आणखी तिघांना संधी देऊ शकतो.
लोकसभा, निवडणुकीला अद्याप तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे जातीय, प्रादेशिक समीकरणांचा विचार करुन राज्यसभेसाठी नावं निश्चित होतील, याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत निष्ठावंतांना संधी मिळू शकते. त्यामुळेच विनोद तावडे, विनय सहस्रबुद्धे, सुनील देवधर यांची नावं चर्चेत आहेत. २०१९ मध्ये तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं. पण त्यानंतर त्यांनी अजिबात खळखळ केली नाही. पक्षानं दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी नेटानं तडीस नेल्या. २०१९ पासून ते संसदीय राजकारणात नाहीत. त्यामुळे यंदा त्यांना संधी मिळू शकते.
भाजप धक्कातंत्र वापरुन कोणाकोणाला संधी देणार याबद्दल चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस २०१४ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यावेळी २०१५ मध्ये राज्यसभेची पोटनिवडणूक झाली होती. काँग्रेसचे दिग्गज नेते मुरली देवरा यांची जागा त्यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. राज्यात भाजप सत्तेत येऊन अवघे काही महिने झाले असताना ही निवडणूक लागली होती. त्यावेळी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक सुरु होती. राज्यसभेसाठी कोणाचं नाव पाठवायचं यासंदर्भात खल सुरु होता.
बैठक सुरु असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीतून अमित शहांचा फोन आला. उद्या सकाळपर्यंत अनुसूचित जातीतील नाव राज्यसभेसाठी पाठवा, अशी सूचना शहांनी केली. बैठकीत असलेले सारेच चकित झाले. राज्यसभेच्या खासदारकीसाठी चेहऱ्याचा शोध सुरु झाला. तेव्हा तिथे असलेल्या कोणीतरी अमर साबळेंचं नाव सुचवलं. पिंपरी चिंचवडमधील पक्षाचे जुने कार्यकर्ते असलेल्या साबळे यांचं नाव निश्चित करुन दिल्लीला पाठवण्यात आलं. भाजप नेतृत्त्वानं त्यांना मान्यता दिली आणि साबळे थेट खासदार झाले. कोणाच्या ध्यानीमनी नसताना साबळे यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. त्यामुळे यंदा भाजप अशा प्रकारे धक्कातंत्र वापरुन कोणाची नावं जाहीर करणार याबद्दल उत्सुकता आहे.
