• Sun. Mar 15th, 2026
    भाजपकडून नारायण चौधरींनाच आधी पसंती, रवींद्र चव्हाणांचं पत्र व्हायरल, अचानक सूत्रं फिरली अन् पक्षाने नामुष्की ओढावून घेतली

    Bhiwandi Mayor Election : अर्ज भरण्याअगोदर रवींद्र चव्हाण यांचे एक पत्र व्हायरल झाले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील या पत्रामध्ये महापौरपदासाठी नारायण चौधरी यांचे नाव निश्चित केल्याचे म्हटले होते

    भिवंडी महापौर निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : भिवंडी-निजामपूर महापालिकेत भिवंडी सेक्युलर फ्रंटच्या पाठिंब्याने महापौरपदी निवडून आलेले भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांचे नाव अगोदर भाजपकडून महापौरपदासाठी निश्चित करण्यात आले होते. याबाबतचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक पत्र व्हायरल झाले होते.

    काय झालं होतं नेमकं?

    भाजपकडून चौधरी यांच्यासह अन्य एका नगरसेविकेने महापौरपदासाठी अर्ज भरला. परंतु, ऐनवेळी पक्षाकडून चौधरी यांना डावलत महापौरपदाच्या निवडणुकीत या नगरसेविकेला मतदान करण्याचे पक्षाच्या सर्व नगरसेवकांना सांगण्यात आले. त्यानंतरच चौधरी यांनी बंडखोरी करत महापौरपद पटकावले.शिवसेना-भाजप महायुतीमध्ये फूट पडत या दोन्ही पक्षांकडून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु, अर्ज भरण्याअगोदर रवींद्र चव्हाण यांचे एक पत्र व्हायरल झाले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील या पत्रामध्ये महापौरपदासाठी नारायण चौधरी यांचे नाव निश्चित केल्याचे म्हटले आहे. भाजपचे भिवंडी शहर अध्यक्ष रविकांत सावंत यांना हे पत्र लिहिण्यात आले होते.
    Maharashtra TimesRajya Sabha Election : शरद पवार भाजपसोबत जाण्याची भीती, राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेसमधून विरोधाचा सूर, एकमेव जागेवर कोणाला संधी?

    ऐनवेळी निर्णय बदलला

    उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली त्यावेळी, चौधरी यांच्यासह भाजपच्या स्नेहा पाटील यांनीदेखील अर्ज दाखल केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शहर अध्यक्षांनी एक पत्र प्रसृत करत स्नेहा पाटील याच अधिकृत उमेदवार असून त्यांना मतदान करण्याचे भाजपच्या सर्व नगरसेवकांना सांगण्यात आले. यामुळे चौधरी कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी महापौरपदासाठी बंडाचा झेंडा फडकावत सेक्यूलर फ्रंटचा पाठिंबा मिळवला. काँग्रेसचे गटनेते मोमीन तारिक अब्दुल बारी यांनी पक्षादेश काढत महापौरपदासाठी चौधरी यांना तर, उपमहापौर पदासाठी त्यांना मतदान करण्याबाबत सांगितले. हा पक्षादेश भिवंडी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ भिंतीवर चिकटवण्यात आला.

    Bhiwandi Mayor Election : काँग्रेसनं बदला घेतला, भाजपचे ६ नगरसेवक फोडले आणि महापौर बसवला

    महापौरपदाच्या निवडणुकीत माजी महापौर विलास पाटील तर, उपमहापौरपदाच्या निवडणूकीत माजी महापौर जावेद दळवी रिंगणात होते. मात्र, या दोन्ही माजी महापौरांना पराभावाला सामोरे जावे लागले.
    Maharashtra TimesMadhuri Manjrekar : शेवटच्या क्षणी BMC चं तिकीट नाकारल्याने ढसाढसा रडलेल्या, पण दीड महिन्यात ठाकरेंकडून बक्षिसी, माधुरी मांजरेकर म्हणतात…

    ‘भाजप नगरसेवकांकडून विश्वासघात’

    महापौरपदासाठी सेक्युलर फ्रंटमधील ४२ नगरसेवक नारायण चौधरी यांना मतदान करतात आणि एकूण ४८ मते मिळवून ते विजयी होतात. मात्र, उपमहापौरपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार मोमीन तारिक अब्दुल बारी यांना ४३ मते पडतात. अन्य पाच भाजप नगरसेवकांची मते त्यांना का मिळाली नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत या नगरसेवकांनी काँग्रेसचा विश्वासघात केल्याचा आरोप काँग्रेसचे भिवंडी शहर अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा