• Fri. Jul 24th, 2026
    Mumbai Police: कर्मचाऱ्याचे आंदोलनकर्त्यांसोबत आक्षेपार्ह कृत्य; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

    Student Protest: नवी दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतूनही प्रतिसाद मिळत असताना, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    मुंबई पोलिसाचं आंदोलनकर्त्या तरुणीसोबत किळसवाणं कृत्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरत आहे. मात्र व्यवस्थेविरोधात आपला असंतोष मांडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या या तरुणांसोबत काही पोलीस कर्मचारी संतापजनक कृत्य करत असल्याचं समोर आलं आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झालेला असतानाच आता आणखी एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. दादर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याचा दावा केला जात होता. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

    विद्यार्थ्यांचा आक्रोश रस्त्यावर दिसू नये, यासाठी सरकारने मुंबईत काही दिवसांसाठी जमावबंदी लादण्याचा निर्णय घेतला. मात्र सरकारच्या या निर्णयानंतरही तरुण उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जमावबंदी आदेशाच्या उल्लंघनाचा दाखला देत पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. अशातच नुकतंच मुंबईतील एका आंदोलनादरम्यान तरुणांची धरपकड सुरू असताना सिव्हिल ड्रेसवरील कर्मचाऱ्याने तरुणीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकारानंतर विविध राजकीय नेत्यांनी चीड व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली.

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, “हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाण कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे,” अशा शब्दांत रोहित पवार यांनी आपला राग व्यक्त केला होतै.

    काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनीही या व्हिडिओवरून संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे. “हा पोलीस कर्मचारी काय करतोय? त्याने महिला पोलिसाला का पुढे केलं नाही? हे अजिबात खपवून घेतलं जाणार नाही,” असं त्या म्हणाल्या.

    दरम्यान, या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली असून कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करत असताना पोलीस कर्मचाऱ्याने तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सदर तरुणी मध्ये आली असून तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याची नजर दुसऱ्या दिशेला होती, असा खुलासा मुंबई पोलिसांकडून करण्यात आला आहे.