Pimpri Chinchwad Police: महिला पोलिसासोबत झालेल्या वादानंतर कॅब चालकाने मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला व नंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पिंपरी-चिंचवड येथील जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर, नाशिक फाट्याहून निगडीच्या दिशेने जात असताना घडली. कॅब चालकाने महिला आरटीओ अधिकाऱ्याला अप्पर-डिप्पर दाखवला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. महिला अधिकाऱ्याने संबंधित चालकाला गाडी आडवी घालून थांबवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी चालकाने आपल्या मोबाईलवर या घटनेचा व्हिडिओ चित्रीत केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. “महिला पोलीस अधिकाऱ्याने मला शिवीगाळ करून माझ्यावर हात उचलला. तसंच मला रात्रभर पोलीस ठाण्यात ठेवून मानसिक त्रास दिला,” असा आरोप कॅब चालकाने केला होता.
या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ने केला असता, महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. महिला आरटीओ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, “संबंधित कॅब चालकाने मला शिवीगाळ केली. त्याचबरोबर माझा हात मुरगळला. तो रॅश ड्रायव्हिंग करत असल्याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने अर्धवट व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.”
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे येथे संबंधित कॅब चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
