Ring Metro Project: ठाण्यात सध्या रिंग मेट्रो प्रकल्प हा वादाचा विषय ठरत आहे.या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विरोध होत असतानाच आता स्थानिक नागरिक देखील विरोध करत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,ठाणे :ठाणे शहरातील प्रस्तावित अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विरोध होत असतानाच आता स्थानिक नागरिकांचाही विरोध तीव्र होत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेनेतच या प्रकल्पाच्या मार्गिकेवरून दोन गट पडल्याचे चित्र आहे. एकाच प्रभागात मेट्रोच्या मार्गावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, प्रस्तावित मार्गबदलाच्या विरोधात सावरकरनगर आणि परिसरातील नागरिकांनी मानवी साखळी करून निदर्शने केली.
स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध
ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो प्रकल्पाच्या मूळ मार्गिकेत बदल करून ती पर्यायी मार्गाने नेण्याचा प्रस्ताव काही लोकप्रतिनिधींनी मांडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या मार्गबदलाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दोस्ती, वेदान्त, कोरस, रुणवाल प्लाझा, अमिझरा, तमन्ना, अमित, स्वामी समर्थ, भैरी भवानी आदी गृहसंकुले, म्हाडा वसाहत तसेच डवलेनगर परिसरातील विविध इमारतींमधील नागरिकांनी याबाबत लेखी आक्षेप नोंदवले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी दिली.
नागरिकांनी हाती निषेधाचे फलक
या आंदोलनात शिवसेनेच्या नगरसेविका कांचन चिंदरकर, माजी नगरसेवक दशरथ पालांडे, मनसेचे संदीप चव्हाण, सागर वर्तक यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांनी हातात निषेधाचे फलक घेत प्रस्तावित मार्गबदलाविरोधात घोषणाबाजी केली.
मार्ग अरुंद
पर्यायी म्हणून सुचवण्यात आलेला मार्ग अरुंद असल्याचा दावा बारटक्के यांनी केला. या मार्गावरून मेट्रो नेल्यास भविष्यात वाहतूक कोंडी वाढू शकते, असे मेट्रो प्रशासनाच्या सादरीकरणात नमूद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय आणि तांत्रिकदृष्ट्याही मूळ मार्गच योग्य असल्याचे या सादरीकरणातून स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.
Ganeshotsav 2026: ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत लाखोंच्या संख्येत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार; चोख बंदोबस्त तैनात
रिंग मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा
ठाणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सुटावा आणि शहराच्या विकासाला गती मिळावी, यासाठी रिंग मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा आहे. मात्र राजकीय किंवा वैयक्तिक हितसंबंधांपोटी मार्गिका बदलू नये. प्रकल्प नियोजित मार्गानेच जलदगतीने पूर्ण करावा, अशी मागणी बारटक्के आणि चिंदरकर यांनी केली. दरम्यान, त्यांच्याच पक्षातील काही लोकप्रतिनिधींनी मार्गबदल सुचवल्याने या मुद्द्याला राजकीय वळण मिळाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा