• Sun. Sep 13th, 2026

Crime News : गाडी चोरायचा अन् गॅरेजमध्ये सुट्टे भाग करून भंगारात विकायचा! पोलिसांकडून अट्टल चोरासह गॅरेज कामगार गजाआड

छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तीन गाडी चोरणाऱ्यांना अटक केली आहे. हे आरोपी चोरलेली गाडी केवळ तीन हजारात गॅरेजमध्ये विकायचे. त्यानंतर गॅरेज कामगार त्या वाहनांचे सुट्टे भाग करुन भंगारात विकायचे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहर आणि ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दुचाकी चोराची धक्कादायक मोडस ऑपरेंडी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. गर्दीच्या ठिकाणाहून महागड्या दुचाकी चोरायच्या, त्या थेट गॅरेज चालकाला अवघ्या 3 हजार रुपयांत विकायच्या आणि गॅरेज कामगार त्या गाड्यांचे सुट्टे भाग करून भंगारात विकायचा, असा हा संपूर्ण काळा धंदा सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आंतरजिल्हा रॅकेटचा पर्दाफाश केला असून तब्बल 18 दुचाकी चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

​शेख इरफान शेख सरवर (वय २७, रा. चौसरनगर, उस्मानपुरा), शेख मुदस्सर शेख अन्सार (वय २३, रा. संजय नगर, बाजीपुरा) आणि गॅरेज मालक अब्दुल रहमान जियाउद्दीन (रा. म्युझिक कॉलनी, रोशन गेट) असे आरोपींचे नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना गुप्त बातमीदाराकडून चिकलठाणा परिसरातून चोरी झालेली हिरो एचएफ डिलक्स गाडी उस्मानपुऱ्यातील चौसरनगर येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी तातडीने सापळा रचून शेख इरफान याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांच्या खाकीचा दणका बसताच त्याने चिकलठाणा, बिडकीन, सिडको आणि बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

Maharashtra TimesSamruddhi Mahamarg : 150 सीसीटीव्ही अन् गोपनीय माहितीदारांचे जाळे, पोलिसांना कडक सॅल्यूट! सिनेस्टाईल दरोडेखोरांच्या नांग्या ठेचल्या

​अशी होती गुन्ह्याची धक्कादायक मोडस ऑपरेंडी

पोलीस तपासात आरोपी इरफानने दुचाकी चोरीची संपूर्ण साखळीच स्पष्ट केली. तो सर्वप्रथम शहर आणि ग्रामीण भागातील गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवून बनावट चावीच्या सहाय्याने किंवा हँडल लॉक तोडून दुचाकी पळवायचा. चोरी केलेली गाडी कुठेही लपवून न ठेवता तो थेट नाशिक रोड किंवा नारेगाव येथील गॅरेज चालकांना अवघ्या 3 हजार रुपयांत विकायचा. त्यानंतर नारेगाव येथील गॅरेजचा कामगार शेख मुदस्सर आणि गॅरेज मालक अब्दुल रहमान हे चोरलेल्या गाड्यांचे तात्काळ पार्ट-पार्ट अलग करायचे. गाड्यांची ओळख पटू नये म्हणून इंजिन, चेसिस आणि इतर भाग सुट्टे करून ते थेट भंगारविक्रेत्यांना विकले जायचे.

Maharashtra TimesAmruta Fadnavis : माझे भाऊ सणाचे दिवस लक्षात घेऊन जे काही करतील, ते शांततेनेच करतील, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य

१८ गुन्हे उघडकीस; ७ गाड्या जप्त अन् आरोपींना बेड्या

पोलिसांनी आरोपी इरफान आणि गॅरेजचा कामगार शेख मुदस्सर या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित १२ गाड्यांचे पार्ट करून विकल्याचे तपासात समोर आले आहे. या धडक कारवाईमुळे चिकलठाणा, बिडकीन, सिडको, बेगमपुरा आणि खुलताबाद पोलीस ठाण्यातील तब्बल १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि लहु घोडे, अंमलदार विठ्ठल डोके, विजय धुमाळ, सनी खरात, महेश बिरुटे, संदीप कोळगे, योगेश तरमळे आणि जीवन घोलप यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.पथकाने ही मोहीम फत्ते केली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा