• Sun. Mar 8th, 2026

    “हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 15, 2026
    “हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा – महासंवाद

    नवी मुंबई, दि.15 (विमाका): श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी ओवे मैदान, से.29, खारघर नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काल (दि. 14 फेब्रुवारी) रोजी दूरदृष्यप्रणालीव्दारे सविस्तर आढावा घेतला.
    या आढावा बैठकीस रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, अपर आयुक्त फरोग मुकादम, ठाणे अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, “हिंद दी चादर” कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक, धर्मजागरण चे कोकण प्रांत प्रमुख महेंद्र रायचुरा, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नवी मुंबई समागम कार्यक्रम समन्वयक रविंद्र राठोड, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप यांच्यासह कोकण विभागातील इतर जिल्ह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळाचे कोकण विभागीय अधिकारी, पनवेल व नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, आरोग्य, नगरपालिका, पोलीस विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारेउपस्थित होते.
    यावेळी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व यंत्रणांना सूचना दिल्या की, या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी सर्व प्रकारे प्रचार प्रसिद्धी करावी. येणाऱ्या भाविकांची अंदाजित संख्या तपासावी आणि त्याप्रमाणे व्यवस्थेचे काटेकोर नियोजनही करावे. या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सर्व स्तरातून सर्व यंत्रणांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. वेबसाईटचा जास्तीत जास्त वापर करावा. स्वच्छता मोहिमा राबवाव्यात. आरोग्य मेळावे घ्यावेत. ग्रामसभा घ्याव्यात. शाळांमधून पालकसभा घ्याव्यात. शाळा-महाविद्यालयांमधून चित्रफीत दाखवावी माहितीपट दाखवावेत, सरताज सतिंदर सिंघ यांचे “हिंद दी चादर” हे गाणे चित्रपटगृहांमधून शाळांमधून अशा विविध माध्यमांमधून जास्तीत जास्त प्रमाणात प्रसारित करावे. प्रभातफेरी काढाव्यात, विविध स्पर्धा आयोजित कराव्यात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यक्रमांमध्ये स्वत: सहभागी व्हावे, क्षेत्रीय भेटी द्याव्यात. प्रत्येक क्षेत्रीय घटकाचे काम व्यवस्थित होत आहे,याची खात्री करावी. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोहोचवावी.आदिवासी दुर्गम भागातही या कार्यक्रमाविषयीची माहिती प्रसारित करावी. शासकीय, खाजगी होर्डिंग्ज, बॅनर्स लावावेत. डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करावा.
    या कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील सर्व सामाजिक घटकांना एकत्रित आणण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करावेत. सामाजिक बैठका घ्याव्यात. समाजाच्या विविध घटकांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. विविध सामाजिक संस्था संघटना यांचाही सहभाग घ्यावा.समाजातील प्रत्येक घटकाला या कार्यक्रमाचे निमंत्रण द्यावे. संत महात्म्यांना विशेष निमंत्रण द्यावे. नवनियुक्त लोकप्रतिनिधी, अशासकीय सदस्य यांना देखील आपल्या सर्व प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत या कार्यक्रमाची माहिती उद्देश पोहोचवावा.
    या बैठकीच्या निमित्ताने धर्मजागरणचे कोकण प्रांत प्रमुख महेंद्र रायचुरा यांनी या कार्यक्रमाचे सामाजिक व राष्ट्रीय महत्व विषद केले.
    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed