• Thu. Mar 12th, 2026

    हिंद-की-चादर’ शताब्दी समागमासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 15, 2026
    हिंद-की-चादर’ शताब्दी समागमासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज – महासंवाद

    नवी मुंबई, दि.15 (विमाका) : शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद-की-चादर’ शताब्दी समागमाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभागातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अत्यंत काटेकोर, बहुस्तरीय आणि समन्वयित वैद्यकीय व्यवस्थापन उभारण्यात आले आहे.
    दि. 28 फेब्रुवारी व 01 मार्च 2026 रोजी ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई येथे होणाऱ्या मुख्य सोहळ्यासाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोंकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि मुंबई या जिल्ह्यांत दि. 10 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत अखंड मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
    कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील या कार्यक्रमाचे राज्य समन्वयक डॉ. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व्यवस्थापनाचा सविस्तर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तरीय आरोग्य व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली असून, नियमित आढावा बैठका घेण्यात आल्या आहेत.
    या नियोजनात जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा सक्रिय सहभाग आहे. यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेशी संलग्न खाजगी रुग्णालयेही आरोग्य सेवा देणार आहेत.
    कार्यक्रमस्थळी अत्याधुनिक आरोग्य सुविधा..
    मुख्य कार्यक्रमस्थळी आवश्यकतेनुसार स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग (OPD) उभारण्यात येणार असून, विविध तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत संसर्गजन्य आजारांची तपासणी, कर्करोग व दंतरोग तपासणी, महिलांच्या आजारांची विशेष तपासणी, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्य साहित्य वितरण, मोफत वैद्यकीय सल्ला व औषधोपचार, 24 तास रुग्णवाहिका सुविधा व तातडीच्या संदर्भ सेवा दिल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, गरजूंना मोफत चष्मे तसेच तपासणीनंतर ज्येष्ठ नागरिकांना काठ्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
    भाविकांच्या सोयीसाठी खारघर व नवी मुंबई शहरातील प्रमुख प्रवेश मार्ग, वाहनतळ (पार्किंग) क्षेत्रे आणि तात्पुरत्या निवासस्थळी वैद्यकीय पथके, प्राथमिक उपचार केंद्रे आणि रुग्णवाहिका सेवा कार्यरत असणार आहेत.
    दि.10 ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत कोकण विभागात जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर मोठ्या प्रमाणावर विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये सिकलसेल तपासणी, रक्तक्षय (अॅनिमिया) तपासणी, क्षयरोग (टीबी) निदान, असंसर्गजन्य आजार तपासणी, बाल आरोग्य तपासणी (आरकेएसके), तसेच आभा कार्ड नोंदणी यांचा समावेश आहे.
    ‘हिंद-की-चादर’ शताब्दी समागमाच्या निमित्ताने कोंकण विभागीय प्रशासनाने उभारलेली ही आरोग्य व्यवस्था लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणारी आणि आदर्श ठरणारी असेल.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed