• Thu. Mar 12th, 2026

    ‘इसे बोलते है ट्रिगर…’; डायलॉग मारला अन् गोळी सुटली

    ByMH LIVE NEWS

    Feb 8, 2026
    ‘इसे बोलते है ट्रिगर…’; डायलॉग मारला अन् गोळी सुटली
    छत्रपती संभाजीनगर
     इसे बोलते है मॅगझिन, और इसे बोलते है ट्रिगर… तान दिया, ट्रिगर दबाया और खेल खल्लास! वास्तव चित्रपटातला हा डायलॉग वाळूजमध्ये एका मित्राने प्रत्यक्ष अमलात आणला. दोन मित्रांमध्ये सुरू असलेल्या पिस्तूल बाजीच्या नादात एकाच्या हातून गोळी सुटली आणि त्याचाच जिवलग मित्र गंभीर जखमी झाला. सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा बनाव करणाऱ्या या मित्रांचे बिंग अखेर वाळूज पोलिसांनी फोडले आहे.

    नेमकं त्या रात्री घडलं काय?

    शनिवारी रात्री वाळूजमधील शिवराई फाटा परिसरात सन्नाटा असताना, अझहर सय्यद आणि महेश पवार हे दोन मित्र गप्पा मारत बसले होते. अझहरच्या हातात एक गावठी कट्टा होता. पिस्तूलसोबत खेळताना किंवा हवा करण्याच्या नादात अझहरकडून अचानक ट्रिगर दाबला गेला. एक भयानक आवाज झाला आणि क्षणार्धात गोळी महेशच्या मांडीत आरपार घुसली.मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून अझहरने त्याला घाटी रुग्णालयात नेले. पण तिथं त्याने एक फिल्मी कहाणी रचली. आम्ही बाईकवर जात असताना टोलनाक्याजवळ कुणीतरी गोळी झाडली, असा बनाव त्याने डॉक्टरांना सांगितला. मात्र, पोलिसांच्या नजरेतून अझहरचा घाम आणि उडवाउडवीची उत्तरं सुटली नाहीत.

    वाळूज पोलिसांचा खाक्या अन् बिंग फुटलं

    वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे आणि उपनिरीक्षक अजय शितोळे यांनी अझहरला ताब्यात घेऊन उलटतपासणी सुरू केली. पोलिसांच्या एकाच प्रश्नावर अझहरची बोलती बंद झाली आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

    पोलिसांनी त्याच्या पडेगाव येथील घरातून गावठी पिस्तूल आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाचरण पांढरे पो उप नि अजय शितोळे पो अ विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितिन धुळे, गफ्फार शेख व पोलीस मित्र किशोर गाडेकर, अमन शेख यांनी केली.

    शस्त्रांचं रॅकेट सक्रिय असण्याचा संशय

    मौजमजेसाठी तरुणांच्या हातात ही जीवघेणी शस्त्रे येतात कुठून? यामागे एखादं मोठं रॅकेट तर नाही ना? या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली असून मस्ती कधी जीवावर बेतेल, सांगता येत नाही याचीच चर्चा रंगली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed