रस्त्यात गाठले अन् हल्ला
आज शनिवारी मतदानाची लगबग सुरू असतानाच, काही अज्ञात हल्लेखोरांनी शरद बुट्टे पाटील यांना गाठले आणि त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुट्टे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार सुनिता बुट्टे यांचे पती आहेत. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
स्थानिकांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने वासुली फाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, बुट्टे पाटील यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे. यावर बुट्टे पाटील यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. ते म्हणाले, ‘रात्री जो हल्ला झाला त्यात मी सुखरूप आहे. डॉक्टरांनी उपचार केले आहेत. पुढील तपासाअंती कारवाई होईल पण मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर याव. कालच्या घटनेनंतर लोकांना वाटत गावात दहशत असेल पण असं काही होणार नाही आपल्या भागाची परंपरा मोठी आहे. ज्यांनी हा प्रकार केला आहे ते सगळे बाहेरचे आहेत इथले कोणी नाही. आपल्या गावातील कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर मी आरोप केलेले नाहीत त्यामुळे गावातील वातावरण चांगले आहे’.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हल्ला
दरम्यान, काही काळापूर्वीच शरद बुट्टे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षबदलामुळे विरोधकांमध्ये असंतोष असल्याचे बोलले जात होते. हा हल्ला याच राजकीय वादातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. मतदानाच्या पवित्र दिवशीच रक्ताचा सडा पडल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.