राज्यात बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्र वाटपाचा घोटाळा समोर येत आहे. अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळा उघडकीस येत आहे. असाच काहीसा मोठा घोटाळा नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत कार्यालयातून तब्बल 15 हजार 569 बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंधार तालुक्यातील सावळेश्वरमधील हा प्रकार आहे. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कंधार तालुक्यातील सावळेश्वर गावाची मूळ लोकसंख्या केवळ 1 हजार 700 इतकी आहे. मे 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत तब्बल 15569 नावे जन्म नोंदणीमध्ये वाढवण्यात आल्याचे उघड झाले. Add old event या टॅबचा वापर करून (CRS) पोर्टल युजर आयडी MH20362RE च्या गैरप्रकारने ऑनलाईन पध्दतीने वापर करून 15569 ऑनलाईन बनावट जन्म नोंदणी करण्यात आली आहे. याप्रकरणी भावना कावळे यांच्या फिर्यादीवरून कंधार ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा घोटाळा उघड झाल्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सावळेश्वर ग्राम पंचायतीला भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कारवाईची मागणी केली. या प्रकरणात सहा राज्यांमध्ये कार्यरत असलेली एक मोठी गँग सहभागी असल्याचा दावा सोमय्या यांनी व्यक्त केलाय. उत्तर प्रदेशातील चार ठिकाणी आणि महाराष्ट्रातील सहा ठिकाणी बोगस नोंदी करून जन्म प्रमाणपत्रे मिळवण्यात आली आहेत. ही गँग पाचहून अधिक राज्यांमध्ये कार्यरत असून या घोटाळ्यासाठी परदेशातून आर्थिक मदत येत असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. नांदेड जिल्ह्यातील इतर गावांमध्येही सखोल चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी यावेळी केली. दरम्यान, बोगस जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.