• Sat. Mar 14th, 2026

    शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेतील ‘ती’ नियमबाह्य निवडणूक रद्द करा- बाजुळगे

    ByMH LIVE NEWS

    Feb 6, 2026
    शास्त्रीनगर गृहनिर्माण संस्थेतील ‘ती’ नियमबाह्य निवडणूक रद्द करा- बाजुळगे

    नांदेड -प्रतिनिधी

    किनवट येथील शास्त्रीनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेमध्ये सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया ‘महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०’ मधील तरतुदींचे उल्लंघन करून राबवली जात असल्याचा आरोप करत, ही प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी सभासद रामराव बाजुळगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. लोकशाही दिनानिमित्त सादर केलेल्या या तक्रारीमुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
    प्रशासक काळात समांतर निवडणूक?
    तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या संस्थेवर १४ ऑगस्ट २०२५ पासून कायदेशीररीत्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. नियमानुसार प्रशासक कार्यरत असताना कोणतीही व्यवस्थापन समिती समांतर निवडणूक घेऊ शकत नाही. असे असतानाही राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची परवानगी न घेता आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती न करता ही प्रक्रिया राबवली गेल्याचा दावा करण्यात आला आहे.
    गंभीर कायदेशीर मुद्दे:
    कलम ७३-सीबी चा भंग: प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय झालेली निवडणूक प्रक्रिया कायद्याने ‘शून्यवत’ ठरते.
    दप्तर छेडछाड: बनावट ‘सौदा चिठ्ठी’चा वापर करून जुन्या सभासदांचे सभासदत्व बेकायदेशीररित्या रद्द केल्याचा आरोप.
    अधिकार नसताना कारवाई: केवळ २० रुपयांच्या विना-नोंदणीकृत स्टॅम्प पेपरच्या आधारे सभासदांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी न देता कारवाई करणे हा नैसर्गिक न्यायाचा भंग आहे.
    कठोर कारवाईची मागणी
    सहायक निबंधक, किनवट यांनी या गंभीर तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली आहे. “नियमबाह्य पद्धतीने अस्तित्वात आलेली समिती तात्काळ बरखास्त करून संस्थेवर पुन्हा प्राधिकृत अधिकारी नियुक्त करावा आणि बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी रामराव बाजुळगे यांनी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed