नांदेड
नांदेड महापालिकेच्या महापौर निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. महापौर पदी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण समर्थकाची वर्णी लागणार की भाजपातील निष्ठावंताला संधी मिळणार यावरून उत्सुकता लागली आहे. अशोक चव्हाण ठरवतील तोच महापौर होणार अशी देखील चर्चा सुरु आहे. असे असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. “महापौर कोण होणार याचा निर्णय नांदेडमध्ये नाही, तर राज्यातील भाजपच्या कोअर कमिटीमध्ये होणार आहे,” असे स्पष्ट संकेत बावनकुळे यांनी दिले. मंत्री बावनकुळे हे आज नांदेड दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट संकेत दिले.
येत्या 10 फेब्रुवारी रोजी महापालिकेची विशेष सभा पार पडणार आहे आणि याच दरम्यान महापौराची निवड होणार आहे. महापौर पद हे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे पक्षातील अनेक महिला नगरसेविका या शर्यतीत असल्याचे चित्र आहे.
कविता मुळे, ज्योती कल्याणकर, वैशाली देशमुख, अनुराधा काळे, शांभवी साले, सुदर्शना खोमणे आदीची नावे चर्चेत आहेत. स्थानिक पातळीवर काही नावे पुढे केली जात असली, तरी अंतिम निर्णय राज्य पातळीवरून होणार असल्याचे बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या समर्थका पैकीच महापौर होईल, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र बावनकुळे यांच्या विधानामुळे “स्थानिक समीकरणांपेक्षा पक्षशिस्त आणि राज्य नेतृत्वाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार” असे संकेत दिसत आहेत. दरम्यान भाजपच्या या विजयामुळे नांदेडच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे मानले जात आहे. महापौर निवडीतून पक्ष कोणता संदेश देतो, याकडे केवळ नांदेडच नव्हे तर राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.