• Tue. Sep 22nd, 2026

एका शब्दात कॅप्शन, अजित दादांचा ‘तो’ फोटो, सुप्रिया सुळेंच्या WhatsApp स्टेटसमधून कसले संकेत?

ByMH LIVE NEWS

Feb 2, 2026
एका शब्दात कॅप्शन, अजित दादांचा ‘तो’ फोटो, सुप्रिया सुळेंच्या WhatsApp स्टेटसमधून कसले संकेत?

बारामती 

खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअपवर शेअर केलेल्या नवीन स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा मोठी चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात अस्वस्थता आणि अनिश्चितता असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरण होण्याच्या चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्या स्टेटसकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासोबतचा जुना फोटो व्हॉट्सअॅपला स्टेटस म्हणून ठेवला असून त्याला ‘बारामती’ कॅप्शन दिलं आहे. राजकीय फूट पडल्यानंतर दोघंही वेगवेगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असले, तरी मुळात दोघंही भावंडं. पक्षात फूट पडली तरी पवार कुटुंब एकसंघ असल्याचं अनेकदा सांगितलं जात असे. अशातच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित सामोऱ्या गेल्या. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा फेर धरु लागली, अशातच अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे या प्रक्रियेला खीळ बसली.

अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी, तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता, या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे स्टेटस महत्त्वाचे मानले जात आहे. अनेकांनी या स्टेटसकडे ‘संकेत’ म्हणून पाहिले असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये समन्वय किंवा एकीच्या दिशेने हालचाली सुरु असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही या स्टेटसबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही कार्यकर्त्यांच्या मते, हा स्टेटस म्हणजे भावनिक संदेश असून, दिवंगत अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देणारा आहे. तर काहींनी यामध्ये राजकीय एकतेचा सूचक इशारा दडलेला असल्याचे मत व्यक्त केले आहे. सोशल मीडियावरही या स्टेटसचे स्क्रीनशॉट व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या तरी सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून या स्टेटसबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर सुरू झालेल्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये या स्टेटसने नव्याने राजकीय रंग भरल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed