Pune IT Engineer Accident Death : 30 वर्षीय सौरभ येरवड्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला होता. रविवारी तो बुलेटवरून जात असताना समोरून आलेल्या भरधाव बाईकने त्याच्या बुलेटला जोरदार धडक दिली. या धडकेत सौरभ खाली पडला आणि त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाली होती
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : शहराच्या पूर्व भागात दोन दिवसांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. महंमदवाडीतील रहेजा विस्टा परिसरात डंपरच्या धडकेत २० वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. लोहगाव येथील निंबाळकर रस्त्यावर समोरून आलेल्या भरधाव दुचाकीच्या धडकेत ३० वर्षीय आयटी इंजिनीअरचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे अवघ्या काही महिन्यांवर त्याचा विवाह आला होता. तसेच हडपसर उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानंतर चाक अंगावरून गेल्याने २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या तिन्ही घटनांमध्ये संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अपघातानंतर फरारी झालेल्या वाहनचालकांचा शोध घेतला जात आहे.
डंपरच्या धडकेत तरुण ठार
महंमदवाडी येथील रहेजा विस्टा रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास लावंण्या हॉटेलसमोरील रस्त्यावर शिवशंभू महादेव मंदिराजवळ अपघात झाला. यात हमजा इमरान सरकार (वय २०, रा. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र केस वसीम खान (वय २०, रा. एनआयबीएम, कुबेरा गार्डन, कोंढवा) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काळेपडळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हमजा आणि केस हे दुचाकीवरून रहेजा विस्टा चौकाच्या दिशेने जात होते. त्या वेळी डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात हमजा याचा जागीच मृत्यू झाला, तर केस याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी संबंधित डंपर ताब्यात घेतला असून, चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
Nashik Crime : तुझ्या नवऱ्याला तू आवडत नाहीस… डॉ मनिषा जेजूरकर मृत्यूप्रकरणी पतीनंतर डॉ स्वाती चव्हाणलाही अटक, लग्नबाह्य संबंधांचा आरोप
कामावर जाताना अपघात
हडपसर उड्डाणपुलावर सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास सासवड रस्त्यावरून हडपसरच्या दिशेने मुख्य उड्डाणपुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला. यात गणेश दत्तात्रेय वाघमोडे (वय २२, रा. भोसले व्हिलेज, फुरसुंगी; मूळ गाव सातारा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश मगरपट्टा परिसरात कामाला जात होते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ते दुचाकीवरून कामासाठी निघाले होते. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर वाहनाचे चाक गणेश यांच्या अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर ते रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरसे आणि नीलेश म्हैसाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गणेश यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गणेश यांचे आई-वडील आणि भाऊ मूळ गावी राहतात. कामानिमित्त ते पुण्यात मोठ्या बहिणीकडे राहत होते. अपघातामुळे हडपसर उड्डाणपुलासह पुणे-सोलापूर रस्ता आणि हडपसर-सासवड रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली.
BMW Car Crash : सनरुफमधून एक मित्र उडाला, थरथरणारा आदित्य, BMW कार हवेत उडून कोसळली, अपघातानंतरचं पहिलं दृश्य काय होतं?
विवाहाच्या तोंडावर आयटी इंजिनिअरचा मृत्यू
लोहगाव येथील निंबाळकर रस्त्यावर समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ३० वर्षीय आयटी इंजिनीअर सौरभ अनंत शेलार (रा. धानोरी जकात नाका, लोहगाव) यांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सौरभ येरवड्यातील एका आयटी कंपनीत नोकरीला होते. रविवारी ते बुलेटवरून जात असताना निंबाळकर रस्त्यावर समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत सौरभ खाली पडले आणि त्यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर संबंधित दुचाकीचालक घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी सौरभ यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. सौरभ यांच्या पश्चात आई-वडील, मोठा भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये त्यांचा विवाह होणार होता. त्यामुळे कुटुंबात विवाहाची तयारी सुरू असतानाच अपघाती मृत्यू झाल्याने शेलार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा