• Tue. Sep 22nd, 2026

मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्धवसेनेविरोधात तक्रारींचा पाढा; राज ठाकरेंनी 2 वाक्यांत विषय संपवला

ByMH LIVE NEWS

Feb 2, 2026
मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्धवसेनेविरोधात तक्रारींचा पाढा; राज ठाकरेंनी 2 वाक्यांत विषय संपवला

मुंबई

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र लढत ७१ जागा जिंकल्या. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा पराभव झाला. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं चांगली कामगिरी केली. त्या तुलनेत राज ठाकरेंच्या मनसेला अपेक्षित यश मिळालं. त्यानंतर आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. या सगळ्या तक्रारी राज ठाकरेंनी ऐकून घेतल्या.मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेनं ११८ जागा जिंकल्या. दोन्ही पक्षांनी बहुमताचा आकडा ओलांडला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं १६४ जागा लढवत ६५ जागांवर बाजी मारली. तर मनसेनं ५३ जागा लढवत ६ जागा जिंकल्या. मनसेची कामगिरी अतिशय सुमार झाली. त्यांचा स्ट्राईक रेट जेमतेम १० टक्केच राहिला. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत काळातील अडचणींचा तपशील सविस्तर मांडला.
आपल्या पक्षाला योग्य जागा मिळाल्या नाहीत. मिळालेल्या अनेक जागांवर शिवसेना उबाठाकडून मदत झाली नाही. अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले. त्याचा फटका मनसेच्या उमेदवारांना बसला, असा तक्रारींचा पाढाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वाचला. राज ठाकरेंनी या सगळ्या तक्रारी ऐकून घेतल्या. आता कोणत्याही तक्रारी नको. अधिक वेगानं आणि अधिक जोमानं कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरेंनी केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

दुसरीकडे राज ठाकरेंची मनसे मुंबईत भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरु झाली. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना उबाठासोबत युतीत लढलेल्या मनसेनं निकाल लागताच शिंदेसेनेला पाठिंबा दिला आणि सत्तेत जाण्याची तयारी केली. त्यानंतर राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त केलेल्या पोस्टमध्ये लवचिक निर्णयांचा उल्लेख होता. त्यातच मुंबईत मनसे भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेनं वेग घेतला. यावर खुद्द राज ठाकरेंनी भाष्य केलं. आम्ही भाजपला पाठिंबा देणार नाही, हे मी स्वत: सांगतोय, असं म्हणत राज यांनी राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed