Mumbai Railway Station: पश्चिम रेल्वेच्या बोरिवली रेल्वे स्थानकावर एक मोठा बदल करण्यात आला आहे. एका नव्या तंत्रज्ञनानामुळे लोकलवर नियंत्रण ठेवणं सोपं होणार आहे. काय आहे हे नवं तंत्रज्ञान, पाहा…
पश्चिम रेल्वेच्या कांदिवली ते बोरिवली दरम्यान पाचवी आणि सहावी मार्गिका उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. याच प्रकल्पाचा भाग म्हणून बोरिवली रेल्वे स्थानकाचं सिग्नलिंग पूर्णपणे आधुनिक केलं जात आहे. आतापर्यंत लोकल वाहतुकीसाठी जुनी रिले-बेस्ड सिग्नलिंग प्रणाली वापरली जात होती, जी अनेक दशकांपासून कार्यरत होती. आता तिच्या जागी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसवण्यात आली आहे.
Mumbai Railway Stations: मुंबईत रेल्वे स्थानकांवर मोठे बदल! 2184 कोटींचा खर्च, भुयारी मार्ग, 16 पूल, नवे प्लॅटफॉर्म; कुठे?
कसा असेल नवा सिस्टम?
या नव्या डिजिटल सिस्टिममुळे लोकल कोणत्या रुळावर आहे, कोणता सिग्नल कधी बदलायचा आहे आणि कोणता मार्ग मोकळा आहे याची सर्व माहिती एका केंद्रीत डिजिटल कंट्रोल सिस्टिममधून मिळणार आहे. त्यामुळे गाड्यांच्या हालचालीवर अधिक अचूक नियंत्रण ठेवता येणार असून, उशीर आणि गोंधळ कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रणालीअंतर्गत एकूण 381 रेल्वे मार्ग एकाच सिस्टिमखाली आणण्यात आले आहेत. यामध्ये 56 सिग्नल डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित केले जात असून, सुरक्षित वाहतुकीसाठी 90 ट्रॅक पॉइंट्स म्हणजेच स्विचेस इलेक्ट्रॉनिक नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहेत. तसेच गाड्यांची स्थिती तपासण्यासाठी 123 ट्रॅक सर्किट्स बसवण्यात आली असून, सातही मार्गिका एका नियंत्रण प्रणालीशी जोडण्यात आल्या आहेत.
राज ठाकरेही सत्तेसाठी हापापलेले नाहीत, शिंदेंची शिवसेना ही आमच्यासाठी एमआयएम : संजय राऊत
काय फायदा होणार?
बोरिवली रेल्वे स्थानकात यासाठी एक अत्याधुनिक सिग्नलिंग नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात दोन 65-इंची 8K डिजिटल स्क्रीन लावण्यात आल्या असून, त्यावर गाड्यांची हालचाल प्रत्यक्ष वेळेत दिसते. त्यामुळे तांत्रिक बिघाड, आपत्कालीन परिस्थिती किंवा गर्दीच्या वेळी अधिक वेगाने आणि योग्य निर्णय घेणं नियंत्रकांना शक्य होणार आहे. 2026 च्या सुरुवातीपर्यंत बोरिवलीची ही नवी सिग्नलिंग प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, ती मुंबई उपनगरीय रेल्वे व्यवस्थेतील सर्वात मोठी आणि सर्वात प्रगत प्रणाली ठरणार आहे.
