संजय राऊतांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून प्रकरणाची चर्चा वाढत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच ३० डिसेंबर रोजी कुलाबा परिसरात हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी अर्ज दाखल केले. यावेळी स्वतः विधानसभा अध्यक्ष तिथे उपस्थित होते. याच दरम्यान माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि नार्वेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
व्हिडिओमध्ये काय आहे?
संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडिओत राहुल नार्वेकर अत्यंत आक्रमक अवतारात दिसत आहेत. ते थेट मुंबई पोलिसांच्या जॉइंट सीपींना फोन लावून आदेश देताना दिसतात की, “हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा आताच्या आता काढून घ्या, हा विधानसभा अध्यक्षांचा आदेश आहे!”
Thane Election: ‘आम्ही निवडणूक लढवायची की नाही?’, विरोधकांच्या उमेदवारांचे अर्ज बाद होण्याच्या सत्रावरून मनसेचा संताप
एवढेच नाही तर, “जर तुम्हाला सहकार्य करायचे नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही,” अशा शब्दांत नार्वेकरांनी राठोड यांना तंबी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून किंवा बिनविरोध निवडीसाठी हा दबाव टाकला जात असल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.
हरिभाऊ राठोड यांचा पलटवार
या संपूर्ण प्रकारानंतर हरिभाऊ राठोड यांनी माध्यमांसमोर येत नार्वेकरांवर गंभीर आरोप केले आहेत. राठोड म्हणाले, “नार्वेकर मला म्हणाले की, मी तुमचे सगळे अधिकार काढून घेईन. त्यावर मी त्यांना ठणकावून सांगितले की, तुम्ही मला फाशीवर चढवू शकता, पण मी झुकणार नाही,नार्वेकरांना स्वतःच्या भावाला, बहिणीला आणि वहिनीला निवडून आणायचे आहे, त्यासाठी ते बीएसपीच्या कार्यकर्त्यांना धमकावून बाहेर काढत होते. तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामे करून घेता आणि आमच्याविरुद्ध अर्ज भरता? अशी विचारणा करत त्यांनी मला सिक्युरिटीवरून धमकावले. तुम्ही घटनात्मक पदावर आहात, हे वागणे तुम्हाला शोभत नाही,” अशा शब्दांत राठोड यांनी नार्वेकरांना सुनावले.
संजय राऊतांचा हल्लाबोल
आज सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी या प्रकरणाचे सूतोवाच केले होते. राऊत म्हणाले, “राहुल नार्वेकर हे काय मला उत्तर देणार? त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतूनच सुरू झाला आहे. त्यांनी उमेदवारांना धमकावले आहे. ३० डिसेंबरचे ४ वाजेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासा, म्हणजे सत्य बाहेर येईल.” राऊतांच्या या वक्तव्यानंतर काही तासांतच हा व्हिडिओ समोर आल्याने नार्वेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे.
