Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये १५ जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. १६ तारखेला मतमोजणी होणार आहे.
एकाच जागेसाठी दोन पक्षांकडून उमेदवारी मिळालेले दोन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २० ब आणि २० अ या जागांवर विचित्र कोंडी निर्माण झाली आहे. नीलम म्हात्रे यांनी प्रभाग क्रमांक २० मधील ब जागेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा दोन पक्षांकडून एबी फॉर्म घेतले. तर संदीप गायकवाड यांनी प्रभाग क्रमां क ३० मधील अ जागेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म घेतले.
हॅलो उद्धव! शिंदेंचा थेट कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; शिवसेनेच्या उमेदवाराचा जीव भांड्यात पडला
दोन्ही उमेदवारांनी एकाच पक्षाचे एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं. पण नीलम म्हात्रे आणि संदीप गायकवाड दोन्ही पक्षाचे एबी फॉर्म दाखल केले. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत. या दोघांकडे एका पक्षाचा एबी फॉर्म मागे घेण्याची संधी होती. त्यासाठी दोघांकडे वेळ होता. पण दोघांनी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही.
नीलम म्हात्रे आणि संदीप गायकवाड यांनी एका पक्षाचा एबी फॉर्म माघारी न घेतल्यानं आता निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची असेल. या दोघांनी आधी ज्या पक्षासाठी अर्ज आणि एबी फॉर्म दाखल केला, त्या पक्षाची उमेदवारी गृहित धरण्यात येईल. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
