• Sun. Jun 21st, 2026

    Rajabhau Waje Emotional : ‘पक्ष सोडेन त्या दिवशी राजकारणारत राहणार नाही’, राजाभाऊ वाजे भावूक

    Rajabhau Waje Emotional : ‘पक्ष सोडेन त्या दिवशी राजकारणारत राहणार नाही’, राजाभाऊ वाजे भावूक

    उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पुन्हा मोठं खिंडार पडताना दिसत आहे. ठाकरेंच्या पक्षाचे 9 पैकी 6 खासदार हे पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. असं असताना ठाकरेंचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी सोबत राहत पक्षनिष्ठा दाखवून दिली आहे. पक्षाच्या फुटीवर भाष्य करत असताना राजाभाऊ वाजे यांना अश्रू अनावर झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा मोठी फूट होताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या लोकसभेतील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पडद्यामागे पार पडत असल्याची माहिती आहे. या घडामोडींची चाहूल लागल्यानंतर ठाकरे गटातही हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाकडून देखील कायदेशीर पावलं उचलली जात आहेत. त्याआधी खासदार संजय राऊत, ठाकरे गटाचे लोकसभेतील गटनेता अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आणि खासदार राजाभाऊ वाजे यांची आज सकाळी दिल्लीत एकत्र पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राजाभाऊ वाजे हे भावूक झालेले बघायला मिळाले. यानंतर एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना राजाभाऊ वाजे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्ष सोडेन त्यादिवशी राजकारणात राहणार नाही, असं वक्तव्य केलं.

    “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे. इतर खासदार का सोडून गेले ते मला माहिती नाही. पण मी ज्या पक्षातून निवडून आलो त्यांच्याबरोबर ठाम आहे, एवढंच मी सांगू शकतो, असं राजाभाऊ वाजे म्हणाले. यावेळी वाजे यांना ऑपरेशन टायगरबाबत प्रश्न विचारला असता, “आजपर्यंत तरी मला कुणी ऑफर दिली नाही. माझ्याशी कुणी बोललेलं नाही. ते माझ्याशी का बोलले नाहीत? ते मलाच समजत नाही. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे बोलले नसतील”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

    राजाभाऊ वाजे भावूक

    यावेळी राजाभाऊ वाजे हे प्रचंड भावूक झाले. त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्यांना रडू कोसळलं. “माझे वडील म्हणाले राजाभाऊचा मला अभिमान आहे. यापेक्षा एक मुलगा म्हणून काय पाहिजे. राजकारण म्हणून मी भावूक नाही. पक्ष म्हणून नाही. पण कुटुंबाची परंपरा होती ती चालवली, माझे वडील आनंदी झाले”, असं राजाभाऊ वाजे म्हणाले.

    “मला बाकीच्यांचं सांगता येणार नाही. मी माझ्यापुरता बोलू शकतो. माझे आजोबा आमदार होते. वडिलांच्या काकू म्हणजे माझ्या आजी या आमदार होत्या. त्यामुळे आमच्या कुटुंबात राजकारण आणि समाजकारण आहे. समाजकारण हे आधी आहे, राजकारण हे दुय्यम आहे”, असं राजाभाऊ म्हणाले.

    “मी पक्षाबरोबर, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे आहे. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे प्रत्येकाचे दृष्टीकोन वेगवेगळे आहेत. पण मी जे करत आहे ते माझ्या सद्सदविवेक बुद्धीने जे सांगितलं आणि माझ्या वडिलांनी जे सांगितलं ते केलं”, असंही राजाभाऊ वाजे म्हणाले.

    “खासदार सहकाऱ्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली असेल तरी मी वैयक्तिक संबंध जपतो. मी जिथे आहे तिथेच राहीन. ज्या दिवशी पक्ष सोडायची वेळ येईल त्यादिवशी राजकारणात राहणार नाही. मी शंभर टक्के सांगू इच्छितो, मी जोपर्यंत खासदार आहे, तोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे”, अशी भूमिका राजाभाऊ वाजे यांनी मांडली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा