• Thu. Jun 18th, 2026

    एक राऊत अन् 7 संजय; ‘सामना’वीर नडत राहिले अन् सेनेत पुन्हा भूकंप; शिंदेंकडून दुसऱ्यांदा दणका

    एक राऊत अन् 7 संजय; ‘सामना’वीर नडत राहिले अन् सेनेत पुन्हा भूकंप; शिंदेंकडून दुसऱ्यांदा दणका

    Operation Tiger: ठाकरेंच्या पक्षात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. शिवसेना उबाठाच्या ९ पैकी ६ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. २०२२ नंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षात खळबळ उडाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: शिवसेनेत ४ वर्षांत दुसरा भूकंप झाला आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. त्यानंतर लोकसभेतील १३ खासदारही गळाला लावले. पुढे शिवसेना पक्ष आणि चिन्हदेखील शिंदे गटाला मिळालं. त्यामुळे ठाकरेंना प्रचंड मोठा धक्का बसला. या धक्क्यातून सावरत ठाकरेंनी २०२४ मध्ये ९ खासदार निवडून आणले. त्यातील ६ खासदारांनी आज ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेसेनेची वाट धरली.

    ठाकरेंच्या शिवसेनेत ४ वर्षांत दुसऱ्यांदा फाटाफूट झाली आहे. त्यामुळे ठाकरेंचं राजकारण संकटात आलं आहे. या सगळ्यात संजय नावाच्या व्यक्ती सर्वाधिक चर्चेत राहिल्या. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडत काँग्रेस, राष्ट्रवादीशी घरोबा केला. या राजकीय खेळीत राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची होती. राऊत सातत्यानं भाजपला लक्ष्य करत राहिले. ठाकरे आणि सेनेची बाजू ठामपणे मांडत राहिले.
    Maharashtra Timesघोटाळे, ईडी अन् अमित शहांना पत्र! आणखी एक पक्ष फुटणार! ऑपरेशन टायगरनंतर कॅबिनेट मंत्र्यांचा दावा
    २०२२ मध्ये शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड झालं. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार आधी सूरत, मग गुवाहाटीला गेले. यानंतर गोव्यामार्ग सगळे मुंबईत आले. पुढे उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या सगळ्या घडामोडींमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंसाठी एकहाती किल्ला लढवला. संजय राऊत बंडखोरांवर तुटून पडले होते. त्यांच्या विधानांची, सनसनाटी दाव्यांची बरीच चर्चा झाली.

    एकीकडे ‘सामना’वीर संजय राऊत एकटेच नडत असताना दुसरीकडे ठाकरेंच्या गोटातील एक-एक शिलेदार शिंदेंकडे जात होते. २०२२ मध्ये झालेल्या बंडात जवळपास ४० आमदारांनी शिंदेंना साथ दिली. यात चार संजयच होते. छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट, बुलढाण्याचे संजय गायकवाड, दिग्रसचे संजय राठोड, मेहकरचे संजय रायमुलकर यांनी शिंदेंना साथ दिली. यापैकी शिरसाट आणि गायकवाड यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
    Maharashtra TimesTMC Split: ऑपरेशन टायगरची चर्चा असताना TMCचे ‘शिंदे’ जोमात; पहिल्या टर्मचा आमदार भाईंच्या 4 पावलं पुढे
    २०२२ मध्ये सेनेत पहिला भूकंप घडवून आणणाऱ्या शिंदेंनी आज ठाकरेंना दुसरा दणका दिला आहे. लोकसभेतील ठाकरेसेनेचे ९ पैकी ६ खासदार शिंदेंनी गळाला लावले. विशेष म्हणजे यात ३ संजय आहेत. संजय जाधव (परभणी), संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई) आणि संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम) यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेसेनेची वाट धरली. २०२२ पासून संजय राऊत ठाकरेंसाठी ढाल होऊन लढत असताना याच कालावधीत ७ संजय पक्षापासून दूर गेले आहेत.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा