• Thu. Jun 18th, 2026

    रेल्वे मालवाहतुकीला मिळणार नवा वेग; १७२ कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 17, 2026
    रेल्वे मालवाहतुकीला मिळणार नवा वेग; १७२ कोटींच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. १७ : महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या मालवाहतूक व्यवस्थेला अधिक गतिमान करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या 3.7 किलोमीटर लांबीच्या सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पनवेल जंक्शनवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

    सध्या कर्जत मार्गावरून रोहाच्या दिशेने जाणाऱ्या मालगाड्यांना पनवेल जंक्शनमध्ये प्रवेश करून इंजिनची दिशा बदलावी लागते. यामुळे वेळेचा मोठा अपव्यय होतो तसेच जंक्शनवरील गर्दीतही भर पडते. नव्या कॉर्ड लाईनमुळे चिखली (कर्जत मार्ग) आणि सोमाटणे (रोहा मार्ग) यांना थेट जोडणी मिळणार असून मालगाड्यांना पनवेलमध्ये प्रवेश न करता सरळ मार्ग उपलब्ध होणार आहे.

    या प्रकल्पामुळे प्रत्येक मालगाडीचा सुमारे 110 मिनिटांचा विलंब टळणार असून मालवाहतुकीची गती लक्षणीयरीत्या वाढेल. देशातील सर्वात महत्त्वाच्या कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मार्गावरील वाहतुकीला याचा थेट लाभ मिळणार आहे. तसेच, या मार्गामुळे दरवर्षी अतिरिक्त 9 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळणे शक्य होणार आहे.

    पनवेल एलिव्हेटेड कॉर्ड लाईनसह एकात्मिक नियोजनाचा भाग असलेला हा प्रकल्प पश्चिम भारतातील रेल्वे मालवाहतूक नेटवर्क अधिक सक्षम आणि कार्यक्षम बनवणार आहे. परिणामी, मालवाहतुकीसह प्रवासी रेल्वे सेवांचे नियोजनही अधिक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. भारतीय रेल्वेच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि बंदरआधारित अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार असून, देशाच्या लॉजिस्टिक क्षमतेतही मोलाची वाढ होणार आहे.

    00000000

    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed