• Wed. Jun 10th, 2026
    Pune News : पालकमंत्री पुण्याचे की गुन्हेगारांचे, गुन्हेगारी मुक्त पुणे करण्याचा दादांचा वादा गेला कुठे?

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून काही गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पुण्यातील कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर याला उमेदवारी देण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजीत दराडे, पुणे: राज्यभरातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पुण्यात राजकीय नाट्य पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (AP) जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. गुन्हेगारीमुक्त पुण्याच्या गप्पा मारणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाने थेट कुख्यात गुंड आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या नातेवाईकांना निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गुन्हेगारांना टायरमध्ये घाला, तुम्हाला गाड्या घोड्या दिल्यात कोयता गँगचा बंदोबस्त करा नाहीतर बघतोच तुमच्याकडे, कोयता गँग दिसली तर तुमची काय बरी गत नाही. अशा एक ना अनेक वलग्ना करणाऱ्या अजित पवारांचं नक्की काय चाललंय हे समजायला मार्ग पुणेकरांना राहिला नाही. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत की गुन्ह्याचे? हा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे.

    कारण पुण्यातील कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर नायर याने प्रभाग क्रमांक ३९ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तिकीटावर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, २०२० मधील युवासेना नेते दीपक मारटकर हत्या प्रकरणात बापू नायरचे नाव समोर आले होते. या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून त्याला अटकही झाली होती. २०२१ मध्ये तो बाहेर आल्यानंतर पुन्हा या प्रकरणात अडकला आणि २०२४ मध्ये जामिनावर बाहेर आला. आता थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्याला अधिकृत उमेदवारी दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
    Maharashtra TimesPune News : गुन्हेगारांना टायरमध्ये घालून फोडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांनी दिली आंदेकर, मारणे यांच्या कुटुंबियांना उमेदवारी
    केवळ बापू नायरच नव्हे, तर ‘गँगवॉर’ची पार्श्वभूमी असलेल्या आंदेकर टोळीलाही अजित पवारांनी बळ दिले आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना प्रभाग २३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही महिला तुरुंगातूनच निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय, पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नी जयश्री मारणे यांनाही अजित पवार गटाने उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

    काही महिन्यांपूर्वी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांनी आता चक्क गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना ‘एबी फॉर्म’ वाटल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली आहे. “गुन्हेगारांना टायरमध्ये घालण्याची भाषा करणारे पालकमंत्री आता त्यांना पालिकेत का पाठवू पाहत आहेत?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.
    Maharashtra TimesPune Municipal Election : चंद्रकांत दादांना विधानसभेत नडणाऱ्या माजी नगरसेवकाचं भाजपने तिकीट कापलं, पण अमोल बालवडकरांनी गेम फिरवला
    दरम्यान, एकीकडे पुणे शहर आयटी हब आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित होत असताना, दुसरीकडे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांचा सक्रिय सहभाग वाढत आहे. खंडणी, हत्या आणि धमकावण्याचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना राजकीय आश्रय मिळाल्याने सामान्य मतदारांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा