शिवसेना आणि भाजपचा अखेर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये तासंतास पार पडलेल्या बैठकीत अखेर जागवाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. भाजपचे प्रमुख नेते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ठाण्यातील आनंदवन या निवासस्थानी आले होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळपास 5 तास हाय व्होल्टेज बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. शिवसेना आणि भाजप यांच्यात याआधीच 207 जागांवर एकमत झालेलं होतं. पण 20 जागांवर तिढा कायम होता. हा तिढा काही केल्या सुटत नव्हता. अखेर एकनाथ शिंदे आणि भाजप नेते यांच्यात पाच तास खलबतं झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सविस्तर चर्चा करण्यात आली. यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या बरोबर एक दिवस आधी हा तिढा सोडवण्यात आला आहे.
शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी एकत्रित येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी या दोन्ही नेत्यांनी महायुतीच्या फॉर्म्युलाबाबत सविस्तर माहिती दिली. मुंबई महापालिकेच एकूण 227 जागा आहेत. यापैकी 90 जागांवर शिवसेना लढणार असल्याचं ठरलं आहे. तर भाजपच्या वाटेला 137 जागा आल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. भाजप आपल्या वाट्यातील जागांमधून मित्रपक्ष असलेल्या रिपाई पक्षाला देणार असल्याचं देखील अमित साटम यांनी यावेळी स्पष्ट केलं.
गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा आहे. ही निवडणूक भाजप, शिवसेना, ठाकरे गट, मनसे या पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ठाकरेंकडून प्रचंड प्रयत्न केले जात आहे. विशेष म्हणजे 18 वर्षांनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजकीय युती झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंसाठी राजकीय अस्तित्वाची निवडणूक असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे भाजप उद्धव ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी भाजपला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मदत होणार आहे.
ठाकरेंची शिवसेना मुंबईत अजूनही ताकदवान आहे. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईत ताकद असल्याचं निकालांमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सामना करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी भाजपने मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत राजकीय युती केली आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेला 90 जागा देण्याचं भाजपने मान्य केलं आहे. तर उर्वरित 137 जागांवर भाजप लढणार आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा