Pune NCP News: दोन्ही पवार एकत्र येण्याचे जवळपास निश्चित झाल्याने नाराज झालेल्या प्रशांत जगताप यांनी नुकताच पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर जगताप यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सुरू असलेल्या जवळीकीच्या चर्चांमुळे प्रशांत जगताप अस्वस्थ होते. पुरोगामी विचारांशी तडजोड नको, या भूमिकेतून त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. ‘मी आगामी महापालिका निवडणूक लढवणार असून माझ्या पुढील वाटचालीचा निर्णय लवकरच जाहीर करेन,’ असे सूचक विधान त्यांनी राजीनामा देताना केले होते.
प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांकडून आमंत्रणे आली होती. मात्र, राजकीय गणिते आणि वैचारिक भूमिका पाहता त्यांनी काँग्रेसला पसंती दिल्याचे समजते. पुण्यात भाजपविरोधात प्रबळ लढा देण्यासाठी काँग्रेस हाच योग्य पर्याय असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
कोणत्या नेत्यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?
योगायोगाने, आज मुंबईतील काँग्रेस भवनात पुणे महापालिका निवडणूक आणि जागावाटपा संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुण्याचे प्रभारी सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह पुण्यातील स्थानिक नेते उपस्थित आहेत. याच बैठकीच्या दरम्यान प्रशांत जगताप मुंबईत दाखल झाल्याने त्यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. काँग्रेसमधील सूत्रांनीदेखील जगताप यांच्याशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पुण्याच्या राजकारणातील हा मोठा बदल आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची समीकरणे कशा प्रकारे बदलणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
